सेलूत गीता ज्ञान महोत्सव
सेलू,(प्रतिनिधी) : गीता हे एक अहिंसात्मक आणि मानवाच्या जीवनात येणार्या समस्यांचे समाधान सांगणारे शास्त्र आहे. श्रेष्ठ परिवर्तनासाठी आध्यात्मिकता, प्रभु चिंतन आणि स्वचिंतनाची गरज आहे. संस्कारी पिढी घडविण्याचे आणि जीवन जगण्याचा श्रेष्ठ मार्ग म्हणजे गीता आहे, असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी राजयोगिनी भारतीदीदी यांनी केले.
येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने श्री साईबाबा मंदिरात आयोजित श्रीमद् भगवत गीता ज्ञान महोत्सवाचे उद्घाटन सोमवार 27 जानेवारी रोजी झाले. त्यावेळी भारती दीदी बोलत होत्या. यावेळी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, माजी जि. प. सभापती अशोक काकडे, उद्योजक रामप्रसाद घोडके, उर्मिला बोराडे, ललिता गिल्डा, ब्रह्माकुमारी शांता बहेन, नंदा बहेन, अर्चना बहेन, सविता बहेन आदींची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व आरतीने कथा महोत्सवाची सुरुवात झाली.
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या, आज जगात अणू, परमाणू बॉम्ब बनविण्याची स्पर्धा सुरू आहे. यातून केवळ विध्वंस होणार आहे. लोकांचा अधिक वेळ व्यर्थ गोष्टी, निंदानालस्ती करण्यात जात असल्याचे चित्र आहे. यामुळे सामाजिक मूल्यांचा झपाट्याने र्हास होत आहे. अशा परिस्थितीत श्रीमद् भगवत् गीता ज्ञान अंगिकारून श्रेष्ठ चरित्र आणि जीवनात श्रेष्ठ परिवर्तन आवश्यक आहे. तसेच रामराज्याची पुनर्स्थापना करण्यासाठी प्रत्येकाने दैवी गुण, सद्गुणांची धारणा करण्याची आवश्यकता आहे, असे त्या म्हणाल्या.
या महोत्सवात 2 फेब्रुवारीपर्यंत सायंकाळी साडेपाच ते साडेआठ या वेळेत कथा निरूपण, तर सकाळी 6 ते 8 यावेळेत म्युझिकल एक्झरसाइज मेडिटेशन तणावमुक्त जीवन शिबिर होणार आहे, याचा लाभ घ्यावा असे आवाहन भारती दीदी यांनी केले. प्रास्ताविक सविता बहेन यांनी केले. सूत्रसंचालन सीमा बहेन यांनी केले. या महोत्सवासाठी ब्रह्माकुमारी शांता, नंदा, अर्चना दीदी, सविता, सरिता, शारदा, योगिता, वैष्णवी, वैशाली, सीमा, प्रणिता, राधा, शिल्पा, रेखा दीदी, रूपा, सारिका, श्रुती, रूपाली दीदी, जया, सोनू दीदी आदींसह ब्रह्माकुमारी परिवारातील भाई, बहेन आदींसह महिला व नागरिक पुढाकार घेत आहेत.


