परभणी,(प्रतिनिधी) : पुणे जिह्यातील नरसापूर येथील तीन वर्षीय चिमुकलीवर एका नराधमाने केलेल्या अमानुष अत्याचारासह निर्घृण हत्येच्या प्रकरणात राज्य सरकारने संबंधित नराधमा विरोधात न्यायालयासमोर भक्कम साक्ष पुराव्यासह खटला उभा करीत फासावर लटकवावे, अशी मागणी समस्त परभणीकरांनी सोमवारी (दि.04) जिल्हा प्रशासनास सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली.

1 मे रोजी दुपारी नरसापूरातील तीन वर्षीय चिमुकलीस गायीचे वासरु दाखवायचे का असे सांगून तीच्यावर अज्ञातस्थळी अमानुष पध्दतीने अत्याचार करीत तीची निर्घृण हत्या केली अन् मृतदेहाचीही विल्हेवाट लावली. या नराधमास सिसिटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस प्रशासनाने ताब्यात घेतले. अन्यथा हा नराधम आणखीन सावध शोधत फिरत राहिला असता, असे मत समस्त परभणीकरांनी जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून नमूद करीत हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे, त्या ठिकाणी अॅड. उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी, न्यायालयात एसआयटी मार्फत भक्कम पुरावे उभे करीत त्या गुन्हेगारास फासावर लटकवावे, अशी मागणी केली.
भविष्यात या पध्दतीच्या किळसवाण्या घटना घडू नयेत, या दृष्टीनेच गृह खात्याने कठोर भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली.


