परभणी,(प्रतिनिधी) : परभणी सारख्या तालुक्यातून 3 हजार 202 बांगलादेशीय रोहिंग्यांना प्रशासनाद्वारे जन्म प्रमाणपत्र वितरीत झाले असून ही बाब अत्यंत गंभीर आहे, असे मत भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खा. किरीट सोमय्या यांनी परभणीत एका बैठकीतून व्यक्त केले. या जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यातील संबंधितांविरुध्द कठोर कारवाई तर होईलच परंतु, या देशविरोधी षडयंत्राची अधिकार्यांनी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे, भविष्यात या पध्दतीची बनावट प्रमाणपत्रे वितरित होणार नाहीत, याची खबरदारी घेतली पाहिजे, असा इशारा दिला.
भाजपाचे नेते सोमय्या हे मंगळवार 28 जानेवारी रोजी दुपारी सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यानिशी जालन्याहून वाहनांद्वारे परभणीत दाखल झाले. लगेचच जिल्हाधिकारी कार्यालय गाठून सोमय्या यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसीलदार डॉ. राजापूरे यांच्यासह अन्य अधिकार्यांबरोबर संयुक्तपणे हितगुज केले. यातून सोमय्या यांनी परभणी सारख्या छोट्या विभागातूनच 70 वर्षांपूर्वी जन्मलेल्या व्यक्तींना प्रशासनाने गेल्या सहा महिन्यात हजारोनिशी जन्म प्रमाणपत्र वितरित केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. जन्म प्रमाणपत्र प्राप्त करणारे बहुतांशी रोहिंगे आहेत, बांगलादेशीय आहेत, असे नमूद करीत सोमय्या यांनी काहींनी केवळ आधार कार्डच्या आधारावर जन्म प्रमाणपत्र प्राप्त केले आहेत. तर काहींनी स्वस्त धान्य दुकानातील अस्पष्ट असणार्या रेशन कार्डच्या प्रती देवून जन्म प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. हे प्रकार अत्यंत गंभीर असून थातूर मातूर पुराव्याच्या आधारे जन्म प्रमाणपत्र वितरित करणे म्हणजे एक प्रकारे देशद्रोहच आहे, असे सूनावले.
यात गुंतलेल्या संबंधितांविरुध्द निश्चितच कारवाई होईल, असे स्पष्ट करतेवेळी काहींनी एखाद दोन प्रमाणपत्राच्या आधारे परस्परच बनावट जन्म प्रमाणपत्र छापल्याचेही प्रकार निदर्शनास आले असल्याची माहिती दिली. तालुका असो, महसूल प्रशासनाकडून चूका निश्चित झाल्या आहेत. काहींनी मोहापोटी या चूका केल्या असतील परंतु, भविष्यात या पध्दतीच्या चूका घडू नयेत, असा इशारा देवून सोमय्या यांनी संपूर्ण राज्यात बांगलादेशीय रोहिंगे हे पध्दतशीरपणे मुंबई, पुणे, नाशिक या महानगरांऐवजी मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जावून पैशाचे आमिष दाखवून, थातूर मातूर कागदपत्रे सादर करीत जन्म प्रमाणपत्र मिळवू लागले आहेत, यात एक मोठी गँगच कार्यरत असून त्यांचे हे षडयंत्र प्रशासनाने ओळखावे हा एक मोठा दहशतवादा सारखाच प्रकार आहे, हे लक्षात घ्यावे, हे देशविरोधी कृत्य, गद्दारी निपटून काढावी, असे आवाहन करीत सोमय्या यांनी संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यातून रोहिंग्यांनी प्राप्त केलेल्या जन्म प्रमाणपत्रांची संख्या सांगितली. थातूर मातूर शपथपत्रे सादर करीत जन्म प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या या रोहिग्यांविरोधात प्रशासनाने तात्काळ खटले दाखल करावेत, पोलिस प्रशासनानेही फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी सूचनाही सोमय्या यांनी केली.
दरम्यान, सोमय्या यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर, महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, माजी नगरसेविका सौ. मंगल मुदगलकर, भाजपाचे नेते बाळासाहेब जाधव, संजय रिझवानी यांच्यासह अन्य नेतेमंडळी व पदाधिकारी उपस्थित होते. ( (छाया- संजय घनसावंत)


