परभणी,(प्रतिनिधी) : शहीद सोमनाथ सूर्यवंशी, लोकनेते विजय वाकोडे व सरपंच संतोष देशमुख यांच्या यांच्या कुटूंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपये अर्थसहाय्य द्यावे व एका व्यक्तीला कायमस्वरुपी शासकीय नोकरीत समाविष्ट करावे यासह अन्य मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवार 30 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.
मध्यवस्तीतील शनिवार बाजारातून दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास या मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चात मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरीकही सहभागी झाले होते. वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष अॅड. सर्वजीत बनसोडे, महासचिव अनिल जाधव, राज्यसदस्य अविनाश भोसीकर, ज्येष्ठ नेते धम्मपाल सोनटक्के, जिल्हाध्यक्ष (दक्षिण) सुनील मगरे, जिल्हाध्यक्ष (उत्तर) तुकाराम भारती, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुनीता साळवे, शहराध्यक्ष रणजित मकरंद, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सर्वश्री तुषार गायकवाड, गणेश गाडे, युवा शहराध्यक्ष प्रमोद कुटे, महासचिव सर्वश्री दिलीप मोरे, शिवाजी वाकळे, जिल्हाउपाध्यक्ष अॅड. चंद्रमोरे, महासचिव माला साळवे, तालुकाध्यक्ष कमलेश ठेंगे, प्रमोद आंभोरे, अॅड. वाय.बी. चव्हाण, अविनाश सावंत, साळवे, बाबासाहेब धबाले यांच्यासह अन्य पदाधिकार्यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चेकर्यांनी राज्य सरकारने या तिघांच्या कुटूंबियांना न्याय द्यावा,
या संदर्भात मोर्चातून फलके झळकवली. त्याद्वारे, नागरीकांचे लक्ष वेधून घेतले. शिवाजी रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुजरी बाजार, गांधीपार्क, आर.आर. टॉवर, नारायण चाळ, स्टेशनरोड मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. त्यावेळी एका शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनास वंचित बहुजन आघाडीतर्फे 14 मागण्यांचे एक सविस्तर निवेदन सादर केले. या सर्व मागण्या तात्काळ पूर्ण व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या निवेदनात तिघांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत द्या, कुटूंबियातील सदस्यांना सेवेत सामावून घ्या, सूर्यवंशी व वाकोडे यांच्या स्मारकाला जागा द्या, संबंधित पोलिस अधिकार्यांविरोधात तात्काळ गुन्हे नोंदवा, निरापराध लोकांवरील गुन्हे मागे घ्या, मारहाण करणार्या पोलिस कर्मचार्यांना निलंबित करा, कोम्बिंग कारवाईत घरांची व वाहनांची तोडफोड करुन जखमी केलेल्या नागरीकांना 25 लाख रुपये अर्थसहाय्य करा, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा, सर्व खटले फास्ट्रॅक न्यायालयात चालवा, तसेच विटंबना प्रकरणातील आरोपीची कसून तपासणी करा, आरोपीस मनोरुग्ण ठरविणार्या डॉक्टरांचीही तपासणी करीत त्यांना सहआरोपी करा, संतोष देशमुख यांच्या मारेकर्यांना फाशीची शिक्षा द्या, लातूर येथील माऊली सोट यांच्या मारेकर्यांना फाशीची शिक्षा द्या, गंगाखेड येथील सुरज जाधव यांच्या मारेकर्यावर कठोर कारवाई करा आदी मागण्या करण्यात आल्या. या प्रसंगी जाहीरसभेतून या मोर्चाचा समारोप झाला.


