परभणी,(प्रतिनिधी) : स्व. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणातील गुन्हेगार असणार्या संबंधित पोलिस अधिकारी-कर्मचार्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, आम्हाला न्याय मिळेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करु, असा विश्वास मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्रीं विजयाबाई सूर्यवंशी यांनी सोमवारी (दि.10) पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या आमदार सुरेश धस यांनी मन मोठे ठेवून पोलिस अधिकारी-कर्मचार्यांना माफ करावे, या आशयाच्या केलेल्या विधानावर जोरदार टिका केली.आमदार धस यांनी या पध्दतीची विधाने करावीत, हे आश्चर्यकारक आहे, असे नमूद करीत सूर्यवंशी यांच्या मातोश्री श्रीमती सूर्यवंशी यांनी आपल्या पोटचा गोळा आपण गमावला आहे. अहोरात्र मेहनत करीत आम्ही कुटूंबियांनी त्यास शिकविण्याठी सर्वार्थाने प्रयत्न केले, वकीलीची तो परिक्षा देणार होता, त्याच्या माध्यमातून कुटूंबियांनी स्वप्न रंगवली होती, त्यानेही भविष्यासंदर्भात स्वप्न रंगवली होती, त्यास पोलिसांनी ताब्यात घेवून अमानुषपणे मारहाण करावी व त्यातून त्याचा मृत्यू व्हावा, हे मोठे दुर्देव आहे. कुटूंबियांच्या दृष्टीने तो मोठा धक्का आहे, त्यातून कुटूंबिय सावरलेले नाही, सावरणारसुध्दा नाही, त्याच्या मृत्यू प्रकरणातील संबंधित पोलिस अधिकारी-कर्मचार्यांना कठोर शिक्षा होईपर्यंत आम्ही लढू, असे त्या म्हणाल्या.


