परभणी,प्रतिनिधी) : शेतकर्यांच्या खात्यात तात्काळ पिक विमा जमा करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी (दि.20) धानोरा काळे येथील गोदावरी नदी पात्रात आमरण उपोषण केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, रामप्रसाद गमे, गजानन तुरे, मुंजाभाऊ लोडे, कैलास काळे, प्रसाद गरुड, माऊली शिंदे व संतोष काळदाते आदींनी मंगळवार 11 फेबु्रवारी रोजी जिल्हाधिकार्यांना एक तपशीलवार निवेदन सादर केले होते. त्याद्वारे, जिल्ह्यात खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी मुळे सोयाबीन, कापुस, मुग, उडीद यांन सारखे पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यात राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले. पीक विमा कंपनी व जिल्हा प्रशासनाने पंचनामे पुर्ण केले.
जिल्ह्यातील सर्वच महसुलमंडळ अग्रीम रक्कमेस पात्र ठरली परंतु, तरी देखील अद्यापही पीक विम्याची रक्कम शेतकर्यांच्या खात्यात जमा झाली नाही, असे निवेदनात म्हटले होते. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेद्वारे 18 जानेवारी रोजी मौजे धानोरा (काळे) येथील गोदावरी नदी पात्रात जल समाधी आंदोलनही करण्यात आले. चार तास पाण्यात राहून आंदोलन केल्यानंतर नंतर जिल्हाधिकारी व पालकमंत्री महोदय यांनी आंदोलकांना शब्द देत आपण अजित पवार यांच्या मार्फत राज्य सरकारकडे उर्वरित असलेली सबसिडी 99 कोटी रुपये आठ दिवसात वर्ग करण्याबाबत प्रयत्न करु, आठ दिवसात जिल्ह्यातील शेतकर्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल, असा शब्द दिला होता, हे निदर्शनास आणून देत 19 फेब्रुवारीपर्यंत सदर विमा द्यावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 20 फेब्रुवारी रोजी उपोषण करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनाद्वारे दिला होता. परंतु, अद्याप राज्य सरकारने पीक विमा कंपनीला 99 कोटी थकीत असलेली सबसिडी दिलेली नाही. परिणामी शेतकर्यांच्या खात्यात विमा जमा झालेला नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि.20) धानोरा काळे येथील गोदावरी नदी पात्रात आमरण उपोषण करण्यात आले. यात काही जिवित हानी झाल्यास पीक विमा कंपनी व राज्य सरकार जबाबदार राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.


