परभणी,(प्रतिनिधी) : जम्मू काश्मिरमधील पहलगाम येथील पर्यटनस्थळी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने गुरुवारी (दि.24) संपूर्ण जिल्ह्यात बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
सकल हिंदू समाजाच्या वतीने बुधवारी (दि.23) जिल्हाधिकारी कार्यालयात एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करीत पहलगाम येथील पर्यटनस्थळी हिंदू पर्यटकांवर धर्म विचारुन अतिरेक्यांनी केलेल्या हत्याकांडाचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला. या भ्याड हल्ल्यात 26 पर्यटक मृत्यूमुखी पडले. तर अनेक पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. या कृत्याची सकल हिंदू समाजाने गांभीर्याने दखल घेतली असून सकल हिंदू समाजाने आपल्या भावना व्यक्त करण्याकरीता गुरुवार 24 एप्रिल रोजी संपूर्ण जिल्हा बंदची हाक दिली आहे. सायंकाळी 5 वाजता शनिवार बाजारातून जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल हिंदू समाजाच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात येणार असून प्रशासनाने या गोष्टीची दखल घ्यावी व सकल हिंदू समाजाच्या संतप्त भावना वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन केले आहे.
झरीकरांद्वारे बंदचे आवाहन….
पहलगाम येथील हिंदू बांधवांवर झालेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ गुरुवार 24 एप्रिल रोजी झरी गावात कडकडीत बंद आयोजित करण्यात आला असून सर्व व्यापार्यांनी व हॉटेल चालकांनी या बंदमध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे. बंद हा कडकडीत असून सायंकाळपर्यंत कोणीही दुकान उघडणार नाही किंवा अर्धशटर उघडे ठेवून आपला व्यवहार सुरू ठेवणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन ‘तुम्ही आम्ही सर्व झरीकर’ यांच्यावतीने करण्यात आले आहे.