परभणी (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे माळसोन्ना येथील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी सोमवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून सद्यस्थितीत कार्यरत तलाठी भोसले यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार तात्काळ काढून टाकावा आणि माळसोन्ना गावासाठी नवीन तलाठी नेमण्यात यावा, अशी ठाम मागणी केली आहे.
गेल्या महिनाभरापासून माळसोन्ना परिसरात सतत मुसळधार पावसामुळे शेती, घरे, विहिरी, आणि शेतातील साधनसामग्रीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या कालावधीत दोन वेळा ६५ मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून, अनेक शेतकऱ्यांची शेती पूर्णतः बाधित झाली आहे. काहींची जमीन खरडून गेली असून, काहींच्या घरात पाणी शिरल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे.
ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे की, अशा परिस्थितीत महसूल प्रशासनाकडून त्वरित पंचनामे होणे आवश्यक असतानाही तलाठी बालकिशन भोसले गावात नियमितपणे येत नाहीत आणि पंचनामे करण्यास टाळाटाळ करत आहेत. तसेच ते गावकऱ्यांना “माझ्याकडे अनेक गावे आहेत”, “पंचनाम्याचे आदेश नाहीत”, “खरडून गेलेल्या जमिनीला तीन वर्ष मदत मिळत नाही” अशा चुकीच्या माहिती देत आहेत. याशिवाय, त्यांच्या गैरवर्तनाबद्दल व उद्धट वागणुकीबद्दलही ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पूरग्रस्त कुटुंबांच्या घरात पाणी शिरल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप झालेल्या नाहीत, त्यामुळे शासनाने जाहीर केलेले अन्नधान्य व इतर मदतसुद्धा अनेकांना मिळाली नाही, अशीही ग्रामस्थांची तक्रार आहे.
या गंभीर परिस्थितीत ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली आहे की, तलाठी भोसले यांच्याकडून माळसोन्ना आणि धसाडी गावांचा अतिरिक्त कार्यभार काढून तातडीने नवीन तलाठी नेमावा. अन्यथा, गावकरी उपोषणासारखा तीव्र लोकशाही मार्ग अवलंबून तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
या निवेदनावर मधुकर रामभाऊ लाड वसंत दिनाजी चव्हाण सुनील बाळाराम टेकाळे विलास लाड शिवाजी पवार विजय लाड विठ्ठल मोरे विठ्ठल पवार राजकुमार लाड शेख मुसा शेख इमाम शेख नादान शेख प्रभाकर लाड शेख रहीम रहेमान शेख मुसा शेख छोटू मिया आदींची नाव आहेत


