परभणी ( प्रतिनिधी) पोरजवळा (ता. जि. परभणी) येथे घडलेली एक हृदय पिळवटून टाकणारी घटना पुन्हा एकदा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे समाजाचे लक्ष वेधते आहे. या गावातील शेतकरी स्वर्गीय गिरमाजी सखारामजी लोखंडे यांनी अत्यंत आर्थिक अडचणींना व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ही घटना समजताच भाजप परभणी महानगर जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजीराव भरोसे यांनी तात्काळ गावाला भेट देऊन शोकाकुल कुटुंबाचे सांत्वन केले. त्यांनी शेतकरी स्व. गिरमाजी लोखंडे यांच्या कुटुंबाला ₹२५,०००/- ची तात्पुरती आर्थिक मदत सुपूर्त केली. त्यांच्या सोबत भाजपा कार्यकर्त्यांनीही उपस्थित राहून कुटुंबीयांना धीर दिला.
श्री. भरोसे यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की, “शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्यांच्या संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी उभं राहणं हेच खरं समाजकारण आहे.” त्यांनी आश्वासन दिलं की पुढील काळात शासनस्तरावरून आणि पक्षस्तरावरूनही शक्य ती सर्व मदत कुटुंबाला मिळवून दिली जाईल.
भरोसे यांनी शासनाकडे या प्रकरणाची दखल घेऊन शेतकरी कुटुंबाला शासनाच्या सर्व योजना, मदत आणि विमा लाभ मिळावेत यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यांनी सांगितलं की, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शेती विषयक योजनांचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जाईल.


