परभणी (प्रतिनिधी) मी आरसा आहे, मी सच्चाई दाखवतो; मात्र अनेकांना सत्य पाहणे आवडत नाही,” असे सांगत पत्रकार समाजाला सत्याचे दर्शन घडवतात, असे प्रतिपादन परभणीचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले. दर्पण दिनानिमित्त मराठी पत्रकार परिषद संलग्न परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित मुख्य कार्यक्रमात ते पत्रकारांना संबोधित करत होते.

जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले की, समाजाचे शिक्षक म्हणून पत्रकारांवर मोठी जबाबदारी आहे. विविध प्रकारचे दबाव, अडचणी असूनही पत्रकार चांगले वृत्तांकन करू शकतात आणि समाजाला योग्य दिशा देऊ शकतात. टिळक, आगरकर, अत्रे हेच समाजाचे शिक्षक होते असे नाही, तर आजचे पत्रकारही समाजाचे शिक्षक म्हणून काम करत आहेत. समाजातील चांगल्या-वाईट गोष्टी पत्रकार दाखवत असतात. पत्रकारांचे योगदान अत्यंत मोठे असून पत्रकारांचे काम हे राष्ट्रनिर्मितीचे आहे. समाजातील महत्त्वाचे प्रश्न मांडणे ही पत्रकारांची जबाबदारी आहे आणि ती त्यांनी पार पाडली पाहिजे. मात्र चटपटीत बातमीच्या नादात अनेकदा बातमीचा गाभा हरवतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
दर्पण दिनानिमित्त सकाळी ९ वाजता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथील सभागृहात मुख्य कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व संपादक विजय जोशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दर्पण दिनाचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी विजय जोशी, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, पूर्णा नगराध्यक्ष विमल ताई कदम,सेलू नगराध्यक्ष मिलिंद सावंत, डॉ. एकनाथ गबाळे,मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे, जिल्हाध्यक्ष प्रभू दीपके, प्रदेश प्रतिनिधी राजकुमार हटेकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. दैनिक सकाळची बातमीदार गणेश पांडे यांना दर्पण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास पत्रकार संघाचे लक्ष्मण मानोलीकर, कोषाध्यक्ष मोईन खान, प्रसिद्धीप्रमुख सुधाकर श्रीखंडे, प्रदीप कोकडवार, गणेश पांडे, विठ्ठल वडकुते, लक्ष्मण बनसोडे, अनिल दाभाडकर, शिवलिंग बोधने, उत्तम बोरसुरीकर, संजय घनसावंत, अमर गालफाडे, राहुल वहिवाळ, मंचक खंदारे, शेख रहीम, प्रवीण देशपांडे, पुरी सर, महेश कोकड, भूषण मोरे, संघपाल आढागळे, मंदार कुलकर्णी, आनंद पोहनेरकर आदींसह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.
दरम्यान, नूतन नगराध्यक्षांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दर्पण दिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमातून पत्रकारांची सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रनिर्मितीतील भूमिका पुन्हा अधोरेखित झाली.


