परभणी,(प्रतिनिधी) : वाढते ताण-तणाव, नैराश्य, चिंता आणि मानसिक आरोग्याच्या समस्या लक्षात घेता समाजाला प्रशिक्षित व संवेदनशील समुपदेशकांची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ब्रह्माकुमारीज परभणी केंद्राच्या संचालिका राजयोगिनी बी.के. अर्चना दीदी यांनी केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (वायसीएमओयू), नाशिक तथा राजयोग एज्युकेशन अॅन्ड रिसर्च फाऊंडेशन (शिक्षा प्रभाग), माऊंट आबू यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘अँडव्हान्स डिप्लोमा इन कौन्सिलिंग अॅन्ड मानसिक आरोग्य’ या शिक्षणक्रमातील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव, प्रमाणपत्र वितरण व सन्मान सोहळा ब्रह्माकुमारीज, ओम निवास, वसमत रोड, परभणी येथे उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी.के. अर्चना दीदी होत्या. यावेळी बी.के. सीमा दीदी, प्रा. बी.के. विकास एल. साळुंखे, डॉ. जगदीश नाईक, विजय मोरे, सुरेंद्र पाथ्रीकर आणि प्रा. सतीश भदाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात राजयोगिनी बी.के. अर्चना दीदी यांनी समुपदेशकाचे कार्य म्हणजे समोरच्या व्यक्तीला संवेदनशीलपणे ऐकून त्याच्या मनाला योग्य दिशा देणे होय, असे सांगितले. राजयोग ध्यानामुळे मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि अंतर्मनाची शक्ती वाढते. ब्रह्माकुमारी संस्थेमार्फत अनेक वर्षांपासून विनामूल्य आध्यात्मिक सेवा दिली जात असून आता प्रशिक्षित समुपदेशकांच्या माध्यमातून समाजाला अधिक व्यापक सेवा मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
रजिस्ट्रार विजय मोरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, हा अभ्यासक्रम केवळ पदवी मिळविण्यापुरता मर्यादित नसून जीवनाला सकारात्मक दिशा देणारा आहे. स्वतःतील उणिवा ओळखून त्यांचे सामर्थ्यात रूपांतर करण्याची कला या शिक्षणक्रमातून शिकविली जाते. समाजातील नकारात्मकता कमी करून आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी प्रशिक्षित समुपदेशकांची मोठी गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. वरिष्ठ पत्रकार सुरेंद्र पाथ्रीकर यांनी वाढती स्पर्धा, धकाधकीची जीवनशैली आणि बिघडत चाललेले मानसिक आरोग्य यामुळे कौन्सिलिंग शिक्षणक्रमाची आवश्यकता अधिक वाढल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमुळे समाजाला सक्षम व संवेदनशील समुपदेशक मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पी.व्ही.जी. इंजिनिअरिंग कॉलेज, नाशिकचे प्रा. सतीश भदाणे यांनी अभियांत्रिकी शिक्षणातील ‘युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज’ संकल्पनेचा उल्लेख करत मूल्यशिक्षणाबरोबरच समुपदेशनाची गरज अधोरेखित केली. तर वायसीएमओयूचे नोडल अधिकारी प्रा. बी.के. विकास साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना कौन्सिलिंग क्षेत्रातील व्यावसायिक संधींबाबत मार्गदर्शन केले. ‘चेकिंग, कॅचिंग आणि चेंजिंग’ हे सूत्र अंगीकारून प्रथम स्वतःमध्ये परिवर्तन घडवून नंतर समाजपरिवर्तनासाठी कार्य करावे, असे त्यांनी सांगितले.
बी.के. सीमा दीदी यांनी आत्महत्या, नैराश्य, चिंता आणि मानसिक तणावाच्या वाढत्या समस्यांकडे लक्ष वेधत योग्य वेळी समुपदेशन मिळणे ही आजची सर्वात मोठी गरज असल्याचे सांगितले. एका व्यक्तीला मानसिक आरोग्य मिळवून देणे म्हणजे संपूर्ण कुटुंबाला आधार देणे होय. ‘समुपदेशक घरोघरी’ ही संकल्पना समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी 22 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कारही करण्यात आला. तसेच तीन विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वात, व्यावसायिक आयुष्यात आणि समाजसेवेच्या कार्यात झालेल्या सकारात्मक बदलांचे अनुभव कथन केले. मानसिक स्थैर्य, मनःशांती आणि समाजसेवेच्या कार्यासाठी कटिबद्ध असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रभा अंतवाल यांनी केले, तर आभार प्रदर्शन वरिष्ठ राजयोगी प्रा. बी.के. तांदळे यांनी केले. यावेळी नवीन प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यात आली. कार्यक्रमातून ज्ञानगंगा घरोघरीसोबत आता वर्तमानकाळाची गरज – समुपदेशक घरोघरी हा संदेश देण्यात आला. प्रशिक्षित समुपदेशक हेच मानसिकदृष्ट्या सशक्त, आनंदी आणि निरोगी समाजाचे खरे शिल्पकार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
परभणीत प्रथमच ‘आध्यात्मिक समुपदेशन केंद्र’ सुरू….
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे ब्रह्माकुमारीज, ओम निवास, वसमत रोड, परभणी येथे विनामूल्य ‘आध्यात्मिक समुपदेशन केंद्रा’चे उद्घाटन करण्यात आले. या केंद्रामार्फत ताण-तणाव, चिंता, नैराश्य, झोपेच्या समस्या, एकाग्रतेचा अभाव, आत्मविश्वासाची कमतरता, कौटुंबिक मतभेद आणि मानसिक अस्वस्थतेमुळे निर्माण होणार्या विविध समस्यांवर मनोवैज्ञानिक व आध्यात्मिक समुपदेशनाची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राजयोग ध्यानाद्वारे मानसिक सक्षमीकरण, सकारात्मक विचारसरणीचा विकास आणि संतुलित जीवनासाठी मार्गदर्शनही येथे दिले जाणार आहे. प्रमाणित समुपदेशकांकडून गोपनीय व विश्वासार्ह सेवा उपलब्ध असून गरजू नागरिकांनी 7083314832 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.


