परभणी,(प्रतिनिधी) पत्रकारांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या घटनेचा व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेने तीव्र निषेध केला असून संबंधित इशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी प्रभारी जिल्हाधिकारी नतिषा माथुर यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

व्हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने सोमवारी (दि.29) जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देत खासदार संजय दिना पाटील यांचा निषेध केला.मुंबईत बातमीचे वृत्तांकन करत असताना खासदार संजय पाटील यांनी पत्रकारांना अर्वाच्च शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मुक्त व निर्भय पत्रकारितेवर गदा येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पत्रकारांवर होणारे हल्ले आणि धमक्यांच्या घटनांवर तातडीने आळा घालण्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच संबंधित खासदार संजय पाटील यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
या निवेदनावर व्हाईस ऑफ मिडीयाचे राज्य सहसरचिटणीस सुरज कदम,मराठवाडा कार्यकारीणी सदस्य सुरेश जंपनगिरे,प्रवीण चौधरी,विशाल माने, जिल्हाध्यक्ष कैलास चव्हाण,ग्रामीण जिल्हाध्यक्ष बालासाहेब काळे, कार्याध्यक्ष विजय कुलकर्णी,सरचिटणीस श्रीकांत देशमुख,दिवाकर माने,संतोष मगर,विष्णु सायगुंडे,नरहरी चौधरी,सय्यद युसुफ,मधुकर खंदारे,नंदकिशोर सुगंधे,शेख माबुद संजय घनसावंत,बाळासाहेब घिके,सय्यद जमिल,शिवाजी वाघमारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. पत्रकारांचा सन्मान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधीत ठेवण्यासाठी राज्य शासनाने या प्रकरणात त्वरित आणि ठोस पावले उचलावेत अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करू असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला


