परभणी,(प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे आणि सुरक्षित अन्न – निरोगी महाराष्ट्र हा उद्देश साध्य व्हावा यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यातील सर्व खाद्य व्यवसाय चालकांसाठी व्यापक अन्न सुरक्षा अनुपालन आदेश जारी केला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 24 जून 2026 रोजी हा आदेश जारी केला असून राज्यातील सर्व खाद्य व्यावसायिकांना त्याचे काटेकोर पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या आदेशानुसार हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, कॅन्टीन, स्वीट मार्ट, बेकरी, केटरिंग आस्थापना तसेच इतर सर्व खाद्य व्यवसायांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत निर्धारित नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. व्यवसायस्थळी मूळ एफएसएसएआय परवाना किंवा नोंदणी प्रमाणपत्र दर्शनी भागात लावणे, परिसरात उच्चस्तरीय स्वच्छता राखणे, कीटक नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करणे, ग्राहकांना सुरक्षित व मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे आणि वापरलेल्या खाद्यतेलाचा पुनर्वापर टाळणे याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अन्नपदार्थ वर्तमानपत्र किंवा अन्य छापील कागदामध्ये देणे अथवा पॅक करणे पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. खाद्य व्यवसायातील कर्मचार्यांची नियमित वैद्यकीय तपासणी तसेच ऋेडढरउ प्रशिक्षण पूर्ण करणेही अनिवार्य करण्यात आले आहे.
विशेष बैठकीद्वारे जिल्ह्यातील खाद्य व्यवसायिकांना मार्गदर्शन..
या आदेशाच्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त अ. ए. चौधरी यांनी 25 जून रोजी परभणी येथे खाद्य व्यावसायिकांची विशेष बैठक घेतली. नारायण चाळ परिसरातील हॉटेल राधिका पॅलेस येथे झालेल्या या बैठकीस जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, कॅन्टीन, स्वीट मार्ट, बेकरी व केटरिंग व्यावसायिक उपस्थित होते. यावेळी व्यापक अन्न सुरक्षा अनुपालन आदेशाची सविस्तर माहिती देत त्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून राज्यभर विशेष अन्न सुरक्षा मोहीम राबविण्यात येत असून नियमांचे उल्लंघन करणार्या आस्थापनांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. गंभीर प्रकरणांमध्ये परवाना निलंबित करणे किंवा रद्द करण्याची कार्यवाहीही केली जाऊ शकते, असा इशाराही विभागाने दिला आहे. जिल्ह्यातील सर्व खाद्य व्यवसाय चालकांनी अन्न सुरक्षा नियमांचे तात्काळ व काटेकोर पालन करून ग्राहकांना सुरक्षित व गुणवत्तापूर्ण अन्न उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभाग, परभणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.


