परभणी, ( प्रतिनिधी ) शनिवारी श्रद्धेने, भक्तिभावाने आणि मनोमन प्रार्थना करण्यासाठी यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात आलेल्या भाविकांवर काळाने अचानक घाला घातला. दुपारी सुमारे तीन वाजताच्या सुमारास मंदिर परिसरात सुरू असलेल्या बांधकामासाठी उभारण्यात आलेला सभामंडप अचानक कोसळला आणि काही क्षणांतच आनंद, भक्ती आणि उत्साहाचे वातावरण आक्रोश, धावपळ आणि अश्रूंमध्ये बदलले. या भीषण दुर्घटनेत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १८ जण गंभीर जखमी झाले आहेत.
परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथील मारुती मंदिर हे पंचक्रोशीत श्रद्धेचे केंद्र मानले जाते. प्रत्येक शनिवारी येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. आजही शेकडो भाविक हनुमंताच्या दर्शनासाठी आले होते. मंदिराच्या भव्य छत आणि सभामंडपाचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू असल्याने परिसरात दगड, लाकूड, बांबू आणि अन्य साहित्य उभारण्यात आले होते.
दुपारी भाविक दर्शन घेत असतानाच अचानक सभामंडपाचा मोठा भाग कोसळला. नेमके काय घडले हे समजण्याच्या आतच अनेक भाविक ढिगाऱ्याखाली दबले गेले. क्षणार्धात परिसरात एकच आरडाओरड सुरू झाली. जखमींच्या वेदनादायी किंकाळ्या आणि आपल्या नातेवाईकांचा शोध घेणाऱ्या कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे हृदय हेलावून गेले.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी जीवाची पर्वा न करता तत्काळ बचावकार्य सुरू केले. माहिती मिळताच पाथरीचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, परभणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. नागरिक, आरपी हॉस्पिटल व शासकीय रुग्णालयाच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत एकूण २३ जण ढिगाऱ्याखाली दबले गेले होते. त्यापैकी उपचारादरम्यान पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये संतोष गडदे (पांगरा), आकाश सुरडोसे (गंगाखेड रोड, परभणी), नुमेश अग्रवाल (जिंतूर), सूरज कोपरटकर (इटोळी) आणि श्रीकृष्ण बलभीम गवारे (चिंचवडगाव, ता. वडवणी) यांचा समावेश आहे.
या घटनेत अनिकेत संतोष गडदे (मंठा), हनुमान लिपणे (बोरगाव), प्रवीण राज भिडे, नारायण दौलत खरात, दादाराव नागोजी भांगे (जवळा), रामकृष्ण बदाडे (माजलगाव), परमेश्वर कुंडलिक राऊत (लोणी), केशव गिरी (देऊळगाव), नागेश इक्कर (कुंभारी), प्रवीण हलगे (सेलू), ओंकार कोपरेटकर (निताली), सौरभ कोठाळकर (केकरजवळा), ऋषिकेश कोपरेटकर (निताली), रामा घुगे (नगरजवळ), रामेश्वर बोंडे (चिंचोली) आणि धनंजय बोचरे (कुंभारी बाजार) यांच्यासह १८ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाच्या वतीने प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच पालकमंत्री मेघना बोर्डीकर या मुंबईहून यशवाडीकडे रवाना झाल्या असून रात्री उशिरापर्यंत त्या घटनास्थळी पोहोचणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
हनुमंताच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेल्या पाच भाविकांचा मृत्यू झाल्याने यशवाडीसह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. अनेक कुटुंबांचे आधारवड हिरावले गेले असून जखमींच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते आणि प्रत्येकाच्या ओठांवर एकच प्रश्न होता—श्रद्धेच्या या प्रवासाचा शेवट असा दुर्दैवी व्हावा, याची कल्पनाही कुणाला नव्हती.
दरम्यान या ठिकाणी आमदार रत्नाकर गुट्टे आमदार राजेश विटेकर तसेच शिवसेना नेते जिल्हा प्रमुख आनंद भरोसे मनपा अध्यक्ष सईद इकबाल आदींनी घटना स्थळी भेट दिली.


