परभणी,(प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची गेली बारा वर्षे ही विश्वास, विकास आणि जनकल्याणाची यशस्वी वाटचाल ठरली असून आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी अनेक ऐतिहासिक निर्णय व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे, असे प्रतिपादन राज्याच्या आरोग्य व ऊर्जा राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.
केंद्रातील मोदी सरकारच्या 2014 ते 2026 या बारा वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा घेण्यासाठी शनिवार 13 जून रोजी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, रामकिशन रौंदळे, सुभाष कदम, रंजीत मोरे, राजेश देशमुख, डॉ. केदार खटिंग, मुकिंद खिल्लारे, अजय चव्हाण, आकाश लोहट, भारत जाधव, देवराव कर्हाळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री बोर्डीकर यांनी विविध विकासकामे आणि जनकल्याणकारी योजनांची माहिती दिली. विकास हे भारतीय जनता पक्षासाठी केवळ घोषणांचे साधन नसून 24 तास, सात दिवस आणि बारा महिने सुरू असलेले अभियान आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ हा मंत्र प्रत्यक्षात उतरवित देशभरात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात आली आहे.
देशातील गावांना जोडण्यासाठी सुमारे आठ लाख किलोमीटर पक्क्या रस्त्यांचे जाळे उभारण्यात आले असून त्यापैकी जवळपास चार लाख किलोमीटर रस्त्यांची निर्मिती गेल्या बारा वर्षांत झाली आहे. केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला असून सुमारे 25 कोटी नागरिक दारिद्र्यरेषेच्या वर आले आहेत. डिजिटल व्यवस्थेमुळे सर्वसामान्यांचे जीवन अधिक सुलभ झाले असून पारदर्शकता वाढल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई कारवायांसारख्या धाडसी निर्णयांमुळे भारताची संरक्षणक्षमता अधिक मजबूत झाली आहे. अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेतही मोठी सुधारणा झाली असून देश नक्षलवादमुक्त करण्याच्या दिशेने उल्लेखनीय प्रगती साधली आहे, असे त्या म्हणाल्या.
कोरोना महामारीच्या काळात 81 कोटींहून अधिक नागरिकांना मोफत धान्याचे वितरण करण्यात आले. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत कोट्यवधी आरोग्य कार्ड वितरित करण्यात आले असून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे नागरिकांना संरक्षण कवच देण्यात आले आहे. उज्ज्वला योजनेमुळे 11 कोटी महिलांना मोफत गॅस जोडण्या मिळाल्या, तर जल जीवन मिशनद्वारे ग्रामीण भागातील 16 कोटींहून अधिक कुटुंबांना नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत 12 कोटींहून अधिक शौचालयांची उभारणी करून स्वच्छतेच्या क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली आहे. तसेच वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवांचा विस्तार करण्यासाठी नवीन एम्स व वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
गरीब, शेतकरी, तरुण आणि महिला हे केंद्र सरकारच्या धोरणांच्या केंद्रस्थानी असल्याचे सांगताना त्यांनी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत लाखो लघुव्यावसायिकांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले. तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमुळे मोठ्या प्रमाणात शेतीक्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आले आहे. देशभरातील अनेक रेल्वे स्थानकांचे जागतिक दर्जानुसार आधुनिकीकरण सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले निर्वाचित पंतप्रधान ठरले असून त्यांना 32 आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले आहेत. त्यांच्या विकासदृष्टीचा आदर्श घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातही विकासाची वाटचाल वेगाने सुरू असल्याचे बोर्डीकर यांनी सांगितले.
वसुधैव कुटुंबकमम हा मंत्र साकार झाला…
भारताने ‘वसुधैव कुटुंबकम’ या भावनेला मूर्त रूप दिले आहे. आज, भारत एक ‘उपाय-प्रदाता राष्ट्र’ म्हणून जागतिक स्तरावर ठामपणे उभा आहे. ‘लस मैत्री’च्या माध्यमातून, भारताने कठीण काळात 99 देशांना औषधे पोहोचवून जगाचा सर्वात विश्वासू मित्र म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे. जी-20 चे आमचे यशस्वी अध्यक्षपद, 39 नवीन दूतावासांचे उद्घाटन आणि 70 लाख कोटी रुपयांहून अधिक थेट परकीय गुंतवणुकीचा (एफडीआय) ओघ, हे भारतावरील जागतिक विश्वासाचे द्योतक आहे. 38 देशांसोबत स्वाक्षरी केलेल्या नऊ मुक्त व्यापार करारांमुळे (एफटीए) आपल्या शेतकर्यांसाठी आणि उद्योगांसाठी प्रमुख जागतिक बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत. आपल्या संस्कृतीची शक्ती पाहा की आज 177 देश एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहेत, असेही बोर्डीकर यांनी यावेळी नमूद केले.


