परभणी, (प्रतिनिधी): मानवत तालुक्यातील यशवाडी येथे मंदिराचा गाभारा कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच बचाव आणि मदतकार्याला गती देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या.
दुर्घटनेनंतर महसूल विभाग, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग तसेच आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी उपस्थित राहून जखमींच्या उपचारांची माहिती घेतली तसेच आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. बचावकार्यादरम्यान कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व संबंधित विभागांमध्ये समन्वय राखण्याच्या सूचना देण्यात आल्या.
***


