परभणी,(प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक प्रगतीवर लक्ष केंद्रित न करता उद्योजकतेकडेही वाटचाल करावी. आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्राविण्य मिळवून राष्ट्रहित व समाजहितासाठी योगदान देणे आवश्यक असून विकसित भारताच्या निर्मितीत युवाशक्तीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. सुधीर राजूरकर यांनी केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), परभणी महानगराच्या वतीने शारदा महाविद्यालयातील स्व. हेमराजजी जैन सांस्कृतिक सभागृहात आयोजित ‘छात्रोदय – नव छात्र नेतृत्वाचा उदय’ गुणवंत विद्यार्थी सत्कार व महानगर कार्यकारिणी घोषणा कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमात परभणी शहरातील विविध शाळांमधील 93 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानगराध्यक्ष प्रा. डॉ. प्रवीण राठोड यांनी केले. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या भावी वाटचालीस प्रेरणा मिळावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अभाविप देवगिरी प्रदेश सहमंत्री दिपाली चिठ्ठे यांनी विद्यार्थी परिषद राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त करत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी विद्यार्थी परिषदेशी जोडले जावे, असे आवाहन त्यांनी केले.
नवनिर्वाचित महानगरमंत्री कु. गायत्री लाड यांनी मनोगत व्यक्त करताना परभणी जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत विद्यार्थी परिषद पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व विविध समस्यांच्या निराकरणासाठी संघटना कटिबद्ध राहील, तसेच विद्यार्थीहिताला केंद्रस्थानी ठेवून समाजोपयोगी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविले जातील, असे त्यांनी सांगितले.
अभाविपची नवीन महानगर कार्यकारिणी जाहीर…
कार्यक्रमात शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, परभणी महानगराची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये कु. गायत्री लाड यांची महानगरमंत्री तर प्रा. डॉ. प्रवीण राठोड यांची महानगराध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून प्रा. डॉ. ज्ञानोबा मुंडे यांनी जबाबदारी पार पाडली. या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व विद्यार्थी परिषद कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


