संभाजीनगर, अकोला व आदिलाबादहून पंढरपूरसाठी अतिरिक्त गाड्यांची आवश्यकता
परभणी,दि.26(प्रतिनिधी) : पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त मराठवाड्यातून मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरकडे रवाना होत असतात. यंदाचा आषाढी एकादशी सोहळा 25 जुलै रोजी होत असल्याने वारकर्यांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन 20 ते 30 जुलैदरम्यान छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि आदिलाबाद येथून विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे.
यासंदर्भातील निवेदन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय व्यवस्थापकांकडे सादर करण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, आषाढी एकादशीसाठी मराठवाड्यातून लाखो भाविक आणि वारकरी पंढरपूरला जातात. सध्या धावणार्या निजामाबाद-पंढरपूर रेल्वेगाडीव्यतिरिक्त अतिरिक्त तीन विशेष गाड्या सुरू करणे आवश्यक आहे.
या विशेष गाड्या छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि आदिलाबाद येथून दररोज चालवून त्यांना कुर्डुवाडी मार्गे पंढरपूरपर्यंत धावण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नियमित धावणार्या निजामाबाद-पंढरपूर रेल्वेगाडीला सहा अतिरिक्त विशेष डबे जोडावेत आणि लातूर स्थानकावर पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने करण्यात आलेल्या या मागणीमुळे आषाढी यात्रेसाठी जाणार्या वारकर्यांची प्रवासातील गैरसोय टळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या निवेदनावर महासंघाचे अरुण मेघराज, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, डॉ. राजगोपाल कलानी, बाळासाहेब देशमुख, रितेश जैन, विठ्ठल काळे, माणिक शिंदे बलसेकर, दयानंद दीक्षित, कदीरलाल हाशमी आदींच्या स्वाक्षर्या आहेत.


