परभणी ( प्रतिनिधी) कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प स्मार्ट पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधी करिता क्षमता विकास या प्रकल्प अंतर्गत पाच दिवसीय, पशुखाद्य व चारा प्रक्रिया प्रशिक्षण पशुवैद्यकीय महाविद्यालयात आज दिनांक 15 जून 2026 रोजी सुरू झाले.
पाच दिवस चालणाऱ्या या निवासी प्रशिक्षणाचे उद्घाटन माननीय डॉ. जगन सोळंके , सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, परभणी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्राणेश येवतीकर हे होते. प्रारंभी प्रास्ताविक प्रकल्प सह समन्वयक डॉ. सुनित वानखेडे यांनी केले.
याप्रसंगी उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना सहाय्यक आयुक्त डॉ. सोळुंके यांनी परंपरागत पद्धतीने ग्रामीण स्तरावरील पशुपालन व्यवसाय करीत असताना हा व्यवसाय करणाऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शनाची माहिती देणे महत्त्वाचे ठरते म्हणून अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची आज गरज आहे असे प्रतिपादन त्यांनी या वेळेस केले. ते पुढे म्हणाले की, स्मार्ट प्रकल्प अंतर्गत यावर्षी हे महाविद्यालयात आयोजित केलेले दुसरे प्रशिक्षण आहे. विविध प्रशिक्षणाद्वारे ग्रामीण भागातील आर्थिक स्तर उंचवण्याचा प्रयत्न अशा प्रशिक्षणाद्वारे होत असतो म्हणून प्रशिक्षणार्थींनी अशा प्रशिक्षणामधून तांत्रिक माहिती मिळवून त्याचा उपयोग आपण करीत असलेल्या पशुपालन व्यवसायाकरिता करावा असे आव्हान त्यांनी केले.
आपल्या अध्यक्षीय समारंभामध्ये, पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, डॉ.प्राणेश येवतीकर यांनी अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी पशुवैद्यकीय महाविद्यालय सदैव तत्पर आणि अग्रेसर असल्याचे नमूद केले. पशुवैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक आणि तज्ञ यांचा ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा पशुपालकांना निश्चितच या प्रशिक्षणाद्वारे होणार आहे असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम खिस्ते यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. विठ्ठल मुंडे यांनी केले. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येकी 10 असे एकूण 20 प्रशिक्षणार्थींकरिता हे प्रशिक्षण सुरू आहे.
सदरील पाच दिवसीय निवासी प्रशिक्षण यशस्वी करण्याकरता प्रकल्प सह समन्वयक डॉ. सुनित वानखेडे यांचे सोबत प्रशिक्षण सह समन्वयक डॉ. विठ्ठल मुंडे डॉ. अमोल पाटील डॉ. विनायक इंगळे परिश्रम घेत आहेत.


