परभणी, (प्रतिनिधी) प्राथमिक शिक्षक पदासाठी आवश्यक असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2026 चे आयोजन दि. 28 जून रोजी परभणी शहर व परिसरातील विविध केंद्रांवर करण्यात आले आहे. पेपर-1 साठी 17 केंद्रांवर 5,807 तर पेपर-2 साठी 23 केंद्रांवर 7,287 परीक्षार्थी प्रविष्ट झाले आहेत.
परीक्षा पारदर्शक, निकोप व गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
परीक्षार्थींना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी त्यांनी पेपर-1 साठी सकाळी 8.30 वाजता आणि पेपर-2 साठी दुपारी 12.30 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. परीक्षा केंद्रावर आधार बायोमेट्रिक पडताळणी व फ्रीस्किंग करण्यात येणार आहे. सकाळच्या सत्रासाठी 10.10 वाजल्यानंतर तसेच दुपारच्या सत्रासाठी 2.10 वाजल्यानंतर कोणत्याही परीक्षार्थ्यास प्रवेश दिला जाणार नाही.
परीक्षार्थींनी आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र यापैकी कोणतेही एक मूळ फोटो ओळखपत्र व त्याची छायाप्रत सोबत आणणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रात मोबाईल फोन, पेजर, डिजिटल घड्याळ, पेन तसेच इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य नेण्यास सक्त मनाई आहे.
दिव्यांग परीक्षार्थींना लेखनिकाची आवश्यकता असल्यास त्यांनी पूर्वपरवानगीसाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कार्यालयाशी संपर्क साधावा. लेखनिकासह कार्यालयास भेट देणे आवश्यक असून लेखनिक इयत्ता 12 वी पेक्षा अधिक शिक्षित नसावा, त्याचे वय 19 वर्षांपेक्षा कमी असावे तसेच तो परीक्षार्थीच्या कुटुंबातील सदस्य नसावा. परीक्षा केंद्रावर ऐनवेळी लेखनिकास परवानगी दिली जाणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
*-*-*-*-*


