परभणी, (प्रतिनिधी) शिक्षण क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे मानवत तालुक्यातील रामेटाकळी येथील सुपुत्र आणि पुण्याच्या उरळी देवाची येथील ‘कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग’ चे प्राचार्य प्रा. डॉ. संदीप उद्धवराव कदम यांना प्रतिष्ठित ‘टाइम्स पावर ब्रँड २०२६’ पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ या आघाडीच्या इंग्रजी वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित या शानदार सोहळ्यात, उच्च शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल त्यांना ‘अग्रगण्य प्राचार्य’ या कॅटेगरीतील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुण्यात पार पडलेल्या एका भव्य आणि दिमाखदार सोहळ्यात बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते अरबाज खान यांच्या शुभहस्ते डॉ.संदीप कदम यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
*ग्रामीण भागातून यशाचे शिखर…*
डॉ. संदीप कदम हे मूळचे मानवत तालुक्यातील रामेटाकळी गावचे रहिवासी आहेत. ग्रामीण भागातून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी शिक्षण क्षेत्रात हे मानाचे स्थान मिळवले आहे. सध्या ते पुण्याच्या नामांकित ‘कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग’चे प्राचार्य म्हणून यशस्वीपणे धुरा सांभाळत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे.


