परभणी,(प्रतिनिधी) : परभणी महानगरपालिकेचे महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा यांच्यावर झालेल्या कथित प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ परभणी महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी व विविध कर्मचारी संघटनांच्या वतीने शुक्रवारी कामबंद आंदोलन करण्यात आले. हल्लेखोरावर कठोर कारवाई करून महापौरांना योग्य सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, 9 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 7 ते 7.30 वाजण्याच्या दरम्यान परभणी महानगरपालिकेतील महापौर दालनात शेख रफिक नामक व्यक्तीने महापौर सय्यद इकबाल यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महापौरांचे स्वीय सहाय्यक रमेश चव्हाण तसेच सुरक्षा रक्षक यांनी प्रसंगावधान राखत संबंधित व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या घटनेची सखोल चौकशी करून हल्ल्यामागील कारणांचा शोध घ्यावा तसेच संबंधित आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महापौरांच्या सुरक्षेत वाढ करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबविण्यात याव्यात, असेही निवेदनात म्हटले आहे.
घटनेच्या निषेधार्थ परभणी महानगरपालिका, म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेना यांच्या वतीने कामबंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात म्युन्सिपल कर्मचारी-कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष नजम खान, जिल्हा सरचिटणीस मनोज गहलोत, परभणी महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नासेर खान पठाण, सचिव विशाल उफाडे, स्वच्छता कामगार संघटनेच्या अध्यक्षा अनुसयाबाई जोगदंड, सचिव के. के. भारसाकळे, अभिजित कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे उपाध्यक्ष खाजा मोईन खान, कोषाध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्यासह कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.


