परभणी,(प्रतिनिधी) : नागपूर येथील दीक्षाभूमीवर 20 ऑक्टोबर 2026 रोजी आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्यासाठी देशभरातून येणार्या आंबेडकरी अनुयायांच्या चारचाकी वाहनांना सर्व मार्गांवरील टोलनाक्यांवर करमाफी देण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष पंडित टोमके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि कोकण भवन येथील प्रादेशिक अधिकारी यांना परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवेदन दिले. त्याद्वारे, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माचा स्वीकार केला. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशभरातून लाखो बौद्ध अनुयायी आणि भीमसैनिक दीक्षाभूमीवर अभिवादन करण्यासाठी येतात. यंदाचा मुख्य सोहळा दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष विलास गजघाटे आणि सचिव डॉ. राजेंद्र गवई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे.
या सोहळ्यासाठी देशाच्या विविध भागांतून अनुयायी आपल्या चारचाकी वाहनांनी नागपूर येथे येतात. त्यांना प्रवासादरम्यान विविध टोलनाक्यांवर कर भरावा लागतो. त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी दीक्षाभूमीला जाणार्या वाहनांना सर्व मार्गांवरील टोलनाक्यांवर टोलमाफी देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनावर महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पंडित टोमके, जिल्हा सचिव संदिपान गालफाडे, विठ्ठल गायकवाड, बाबाराव आर्वीकर आणि राष्ट्रपाल कुरवाडे यांच्या स्वाक्षर्या आहेत.


