पालम (प्रतिनिधी) :शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा आणि नागरिकांमध्ये कायद्याविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने पालम येथे आयोजित ‘शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा आणि कायदेविषयक महाशिबिरा’चे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा परभणी जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती सचिन एस. देशमुख यांच्या हस्ते या महाशिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एम. सादराणी हे होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, दिवाणी न्यायाधीश मनिषा एम. पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव भूषण एम. काळे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. एस. टी. अडकिणे आणि पालम तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. शाम आर. रोकडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या महामेळाव्याच्या माध्यमातून विविध शासकीय विभागांचे स्टॉल्स लावून नागरिकांना योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. तसेच, कायदेविषयक महाशिबिरातून नागरिकांना मोफत विधी सल्ला व कायद्याची माहिती पुरवण्यात आली. या उपक्रमास तालुकाभरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


