परभणी,(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशान्वये, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांच्यावतीने शनिवार दि. १२ डिसेंबर २०२६ रोजी परभणी व हिंगोली जिल्हयातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सर्व प्रकारची तडजोडपात्र फौजदारी व दिवाणी स्वरूपांची इतर प्रकरणे, भारतीय चलनक्षम दस्तऐवज अधिनियम १८८१, बँक वसूली प्रकरणे, मोटार अपघातांची प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, भू-संपादन प्रकरणे, वीज प्रकरणे (चोरीची प्रकरणे वगळून) व पाणी आकार प्रकरणे, वेतन व भत्त्यांची सेवा विषयक प्रकरणे आणि महसूल प्रकरणे, तसेच बँकेचे वसुली वादपुर्व दाखल प्रकरणे ठेवता येतात. १२ डिसेंबर २०२६ रोजी आयोजीत लोकअदालतीमध्ये संबंधीत पक्षकार सहभाग घेवु शकतात.
लोक अदालतमध्ये प्रकरणात तडजोड करण्यासाठी माननीय न्यायाधीश व वकील यांचे पॅनल आपल्याला मदत करेल. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. लोक अदालतमध्ये प्रकरण तडजोडीने मिटल्यास दाखल कोर्ट फीस नियमानुसार परत मिळते.
दिनांक १२ डिसेंबर २०२६ रोजी आयोजीत सदर राष्ट्रीय लोक अदालतमध्ये जास्तीत जास्त तडजोड पात्र प्रकरणे ठेऊन तडजोडीने निकाली काढण्याचे आवाहन परभणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष तथा प्रमुख परभणी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एम. सादरणी यांनी केले आहे.
ज्या पक्षकारांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत आणि ज्यांना ती प्रकरणे तडजोडीने मिटविण्याची इच्छा आहे, त्यांनी त्यांच्या सन्माननीय विधीज्ञांशी संपर्क करावा. अथवा अधिक माहितीसाठी व आपले प्रकरण दिनांक १२ डिसेंबर २०२६ रोजी आयोजीत लोक अदालतीमध्ये ठेवण्यासाठी आपल्या जवळच्या न्यायालयातील तालुका विधी सेवा समिती किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांचेकडे संपर्क करावा, असे आवाहन सचिव श्री.बी.एम. काळे यांनी केले आहे.
***


