परभणी, (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनातील सर्व विभागांनी समन्वयाने, नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीने काम करावे. दुष्काळ निवारणाच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची कुचराई किंवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. दुष्काळग्रस्तांसाठी शासनाकडून जाहीर होणारा निधी कोणत्याही विलंबाशिवाय वेळेत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. शेतकरी आणि नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत, असे निर्देश परभणी जिल्ह्याचे पालक सचिव तथा ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आज डॉ. पुलकुंडवार यांनी जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थिती आणि विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.
बैठकीस जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, जिल्हा परिषदेच्या प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, प्र. अपर जिल्हाधिकारी शोभा जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, शैलेश लाहोटी, युवराज डापकर, संगीता चव्हाण जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण, श्री. घोणसीकर, सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
डॉ. पुलकुंडवार यांनी बैठकीत प्राधान्याने जिल्ह्यातील दुष्काळ स्थिती, पाणीटंचाई, जलसंधारण, चारा उपलब्धता, शासकीय योजनांची अंमलबजावणी, जिल्हा वार्षिक योजना आणि विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी सर्व विभागप्रमुखांना स्पष्ट सूचना देताना दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना पाणी, जनावरांना चारा आणि इतर अत्यावश्यक सुविधांची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले.
*जलतारा शोषखड्डे व जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य*
दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे प्रभावीपणे करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या एक एकर क्षेत्रात किमान एक जलतारा शोषखड्डा तयार करावा, यासाठी संबंधित विभागाने शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. तसेच प्रत्येक घराच्या परिसरात रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी जनजागृती करावी. या माध्यमातून पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूजलपातळीत वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेत.
जलतारा शोषखड्डे आणि चारा लागवडीसाठी व्हिबी-रामजी योजनेच्या निधीतून प्राधान्य द्यावे. संबंधित यंत्रणांनी या कामांची प्रभावी अंमलबजावणी करावी. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही दुष्काळ निवारणाची आवश्यक कामे प्रस्तावित करून त्यांना तातडीने गती द्यावी, असे, त्यांनी सांगितले.
*पाणीटंचाईवर नियंत्रण; पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करा*
पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी राखून ठेवावा. पिण्याचे पाणी अन्य कारणांसाठी वापरले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. पाण्याची चोरी आणि अनधिकृत उपसा रोखण्यासाठी कडक कार्यवाई करावी. प्रकल्प, तलाव आणि बंधाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करावी. प्रकल्प, बंधाऱ्यांची आवश्यक दुरुस्ती तातडीने पूर्ण करावी.
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत ज्या प्रकल्पांमधील गाळ काढण्याची कामे अपूर्ण आहेत, ती प्राधान्याने पूर्ण करावीत. सर्व कामे गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत.
*चारा उपलब्धतेसाठी तातडीने उपाययोजना*
दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्यास विशेष प्राधान्य द्यावे. शेतकऱ्यांना चारा लागवडीसाठी आवश्यक बियाणे तातडीने उपलब्ध करून द्यावे. चारा लागवडीचे क्षेत्र वाढविण्यासाठी संबंधित विभागांनी शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांना प्रोत्साहित करावे.
टंचाईग्रस्त गावांमध्ये तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन परिस्थितीची पाहणी करावी आणि आवश्यक उपाययोजना कराव्यात.
*निधी वितरणातील विलंब खपवून घेणार नाही*
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीचे वाटप कुठेही प्रलंबित असल्यास त्यामागील अडचणी तातडीने दूर कराव्यात. पात्र लाभार्थ्यांना मदत वेळेत मिळाली पाहिजे.
शासनस्तरावर कोणतीही कामे किंवा प्रस्ताव प्रलंबित असल्यास त्याची माहिती तातडीने सादर करावी. संबंधित कामांचा शासनस्तरावर पाठपुरावा करून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका आणि नगरपालिकांनी पाणीपट्टी वसुलीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. त्यासाठी विशेष वसुली मोहीम राबवावी. विजेअभावी कोणतीही पाणीपुरवठा योजना बंद राहणार नाही, यासाठी संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी.
*लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या; नागरिकांशी थेट संवाद साधा*
दुष्काळ निवारणाची कामे करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे. नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. कामांच्या अंमलबजावणीत अनावश्यक विरोध निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींना तातडीने प्रतिसाद देऊन त्यांचे प्रश्न सोडवावेत. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, असा इशाराही त्यांनी दिला.
*जिल्हा वार्षिक योजनेचा शंभर टक्के निधी खर्च करा*
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता तातडीने घेऊन प्रलंबित असलेली कामे वेळेत पूर्ण करावीत. मंजूर निधीचा शंभर टक्के विनियोग होईल, याकडे विभागप्रमुखांनी विशेष लक्ष द्यावे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दुष्काळ निवारणाची आवश्यक कामे प्रस्तावित करून त्यांची अंमलबजावणी वेळेत करावी. विकासकामांमध्ये गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी.
*बालविवाह रोखण्यासाठी विशेष दक्षता; पीसीपीएनडीटी कायद्याची कठोर अंमलबजावणी*
जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी प्रशासनाने प्राधान्याने कार्यवाही करावी. ग्रामपंचायत, पोलीस पाटील आणि आशा, अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून गावपातळीवर बालविवाह रोखण्यासाठी सतत लक्ष ठेवावे. बालविवाहाची माहिती मिळताच तातडीने हस्तक्षेप करून प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी. जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण कमी करण्यासाठी जनजागृती आणि प्रभावी देखरेख करावी.
तसेच पीसीपीएनडीटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करून बालविवाहांना आळा घालावा. संबंधित यंत्रणांनी नियमित तपासणी आणि आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
*शिक्षण, आरोग्य आणि पोषणाकडे विशेष लक्ष द्या*
शासनाच्या शाश्वत विकास ध्येयांतर्गत शिक्षण, आरोग्य आणि पोषण या महत्त्वाच्या बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करावे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे का, याची खातरजमा करावी. शाळा, अंगणवाड्यांच्या इमारती नादुरुस्त असल्यास त्यांची तातडीने दुरुस्ती करावी.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सर्व ग्रामपंचायतींचा सहभाग सुनिश्चित करून अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी. प्रत्येक गावात स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी.
*प्लास्टिक निर्मूलन आणि वृक्षलागवडीवर भर*
सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या (घनकचरा व्यवस्थापन) माध्यमातून पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिका यांनी संयुक्तपणे प्रयत्न करावेत. प्लास्टिक निर्मूलनासाठी विशेष मोहीम राबवावी. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक तसेच आवश्यकतेनुसार गुन्हे दाखल करण्याची कार्यवाई करावी. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनाला चालना द्यावी.
*नागरिकांना शासकीय सेवा वेळेत मिळाव्यात*
विविध सेवा केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या शासकीय सेवांमध्ये कोणताही विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी. नागरिकांची प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करावीत. प्रत्येक विभागाने आपल्या कामकाजाचा नियमित आढावा घेऊन नागरिकांना अधिक सुलभ आणि तत्पर सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश डॉ. पुलकुंडवार यांनी दिले.
दुष्काळ निवारण ही केवळ एका विभागाची जबाबदारी नसून संपूर्ण प्रशासनाची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व विभागप्रमुखांनी समन्वयाने काम करून प्रत्येक उपाययोजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी. कागदोपत्री कार्यवाही न करता नागरिकांना प्रत्यक्ष दिलासा मिळेल, अशा पद्धतीने कामे पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश या आढावा बैठकीतून विभागप्रमुखांना देण्यात आले.
***


