परभणी, (प्रतिनिधी): समाजातील हुंडा प्रथेसारख्या अनिष्ट रूढीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस ‘हुंडाबंदी दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी केले आहे.
महिला व बाल विकास विभागाच्या शासन राजपत्रातील २५ जुलै २०१६ च्या अधिसूचनेनुसार, हुंडा प्रतिबंधक अधिनियम १९६१ च्या कलम ८ (ब) (१) आणि महाराष्ट्र राज्य हुंडा प्रतिबंधक नियम २००३ मधील नियम ४ अन्वये राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर हुंडा प्रतिबंधक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
समाजात आजही हुंडा प्रथा कायम असून, अनेक महिलांना या कुप्रथेचा त्रास सहन करावा लागत आहे. विवाहाच्या वेळी किंवा विवाहानंतर रोख रक्कम, मालमत्ता, वस्तू, दागिने अथवा अन्य आर्थिक लाभाची मागणी करणे हुंडा मानले जाते. हुंडा देणे, घेणे किंवा त्यास प्रोत्साहन देणे हा कायद्याने गुन्हा आहे. या प्रथेला आळा घालण्यासाठी हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच जनजागृती व प्रचार-प्रसिद्धीद्वारे नागरिकांना हुंडा प्रतिबंधक कायद्याची माहिती द्यावी. हुंड्याची मागणी किंवा संबंधित गुन्हा घडल्यास कायद्यातील तरतुदीनुसार कार्यवाही करावी.
हुंडामुक्त समाज निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व हुंडा प्रतिबंधक अधिकारी आणि सुजाण नागरिकांनी २६ नोव्हेंबर हा दिवस ‘हुंडाबंदी दिन’ म्हणून साजरा करून जनजागृती उपक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
*-*-*-*-*


