हिंगोली, (प्रतिनिधी) पोलिस व नागरिक यांच्यातील संवाद अधिक बळकट करून लोकोपयोगी कामकाजातून पोलिस-जनता संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने नांदेड परिक्षेत्रात सुरू करण्यात आलेल्या ‘जनसंवाद’ उपक्रमांतर्गत आज (दि. २५ नोव्हेंबर) हिंगोली येथे नागरिकांकडून एकूण ९ तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत त्यांच्या तात्काळ निवारणासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
हिंगोली जिल्ह्याच्या कामकाजाचा मासिक आढावा घेण्यासाठी पोलिस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप हे सकाळपासूनच हिंगोली पोलिस अधीक्षक कार्यालयात उपस्थित होते. यावेळी दुपारी ३.०० ते ४.३० वाजेदरम्यान त्यांनी जिल्ह्यातील तक्रारदारांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या कालावधीत ९ तक्रारदारांनी आपले लेखी अर्ज सादर केले. यामध्ये मालमत्ताविषयक वाद, मारहाण, दाखल गुन्ह्यांचा तपास तसेच अवैध व्यवसाय आदी तक्रारींचा समावेश आहे.
प्राप्त तक्रारींच्या जलद निपटारासाठी पोलिस उप महानिरीक्षक कार्यालयाकडून यापूर्वीच ‘संवेदना’ ही तक्रार निवारण प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. आजच्या जनसंवाद उपक्रमादरम्यान प्राप्त सर्व अर्ज ‘संवेदना’ पोर्टलद्वारे पुढील चौकशी व कारवाईसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात येणार आहेत. प्रत्येक तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीचा आढावा नांदेड परिक्षेत्र कार्यालयातील फीडबॅक टीममार्फत घेतला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या प्रसंगी पोलिस अधीक्षक श्री श्रीणिक लोढा, अपर पोलिस अधीक्षक श्री कमलेश मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी, वसमत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक तसेच शहरातील पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.


