परभणी,(प्रतिनिधी) : सोयाबीन पिकाच्या प्रलंबित 17 महसूल मंडळातील पिकविम्याबाबत पिकविमा कंपनीने केंद्र सरकारकडे केलेल्या अपीलावरील सुनावनी प्रलंबित असल्याने 17 महसूल मंडळातील शेतकरी पिकविम्याच्या प्रतिक्षेत ताटकळत आहेत.
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरिप हंगाम सन 2025-26 या वर्षात जिल्ह्यातील 5 लाख 73 हजार 302 शेतकर्यांनी विमा अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 3 लाख 84 हजार 725.15 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविण्यात आला. जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2025-2026 अंतर्गत सोयाबीन पिकासाठी एकूण 52 महसूल मंडळापैकी 24 महसूल मंडळातील शेतकर्यांना एकूण 124.99 कोटी पिक विमा मंजूर झाला. त्यापैकी 123.43 कोटी पिकविमा रक्कम वाटप करण्यात आली. तसेच तूर पिकासाठी एकूण 52 महसूल मंडळापैकी 14 महसूल मंडळातील शेतकर्यांना एकूण 22.13 कोटी पिकविम्याची रक्कम मंजूर झाली. त्यापैकी 21.57 कोटी पिकविम्याची रक्कम वाटप करण्यात आली. सोयाबीन पिकाच्या प्रलंबित 17 महसूल मंडळातील पिकविम्याबाबत जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर सूनावनी होऊन पिक विमा कंपनीस ड्राय रेशो नुसार पिकविमा वाटप करण्याचे आदेशित करण्यात आले. परंतु, पिकविमा कंपनीने केंद्र सरकारकडे आक्षेप दाखल करीत अपील केले आहे. त्यावरील सूनावनी अद्याप प्रलंबित राहिल्याने या 17 महसूल मंडळातील शेतकर्यांना पिकविम्याकरीता ताटकळत रहावे लागले आहे.
दरम्यान, या जिल्ह्याचे पालक सचिव तथा ग्रामविकास व पंचायत विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या परभणी दौर्यातील आढावा बैठकीत या विषयाच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावेळी पालक सचिवांनी या संदर्भात संबंधित अधिकार्यांना पाठपुरावा ठेवावा, असे निर्देश दिले आहेत.


