परभणी,(प्रतिनिधी) : लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईतील आरोपी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्शीकर व शेख असलम शेख रज्जाक या दोघांची न्यायालयाने शुक्रवारी दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली.
जिल्हा परिषदेंतर्गत सामान्य प्रशासन विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. घोन्शीकर याच्याकडे समाजकल्याण विभागाचा सहाय्यक आयुक्त म्हणून अतिरिक्त पदभार होता. तर जिंतूर येथील किशनराव वसेकर निवासी अस्थिव्यंग विद्यालयातील कला शिक्षक शेख असलम शेख रज्जाक हा जिल्हा परिषदेंतर्गत दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयात प्रतिनियुक्तीवर होता. या दोघांविरोधात एका तक्रारकर्त्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागात एक तक्रार दाखल केली. त्याद्वारे, सेवानिवृत्तीची थकीत वेतनाची रक्कम अदा करण्याकरीता या दोघांनी एकुण 12 लाख 46 हजार 498 रुपयांच्या रक्कमेपैकी 15 टक्के रक्कम म्हणजे 1 लाख 80 हजार रुपये मागितल्याचे नमूद केले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने याबाबतची सत्यता पडताळणी केली. पाठोपाठ गुरुवारी (दि.26) दुपारी बसस्थानकाजवळील मिलन ऑप्टिकल्स समोर सापळा रचून शेख असलम यास दुपारी 3 वाजून 12 मिनीटांना ती रक्कम स्विकारतांना रंगेहाथ पकडले होते. त्याने डॉ. घोन्सीकर यांना मोबाईलद्वारे ती रक्कम स्विकारल्याचे सांगून पैसे कुठे आणून देऊ असे विचारले तेव्हा घोन्शीकर याने ‘ती रक्कम घेऊन घराकडे या’ अशी सूचना केल्याचेही निष्पन्न झाले. त्या पाठोपाठ या खात्याचे पोलीस उपअधिक्षक किशोर तोरणे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने जिल्हा परिषद कार्यालयातून डॉ. घोन्शीकर यास ताब्यात घेतले. या दोघांविरोधात शुक्रवारी येथील कोतवाली पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाडे, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक किशोर तोरणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निलपत्रेवार, शिपाई बोधणकर, नागरगोजे आणि चुले यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. तर हिंगोली येथील पोलीस निरीक्षक नागेश मलपल्लू यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घर झडती घेतली. त्यात 5 लाख 40 हजार 600 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
दरम्यान, अटक केलेल्या या दोघांना शुक्रवारी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्या दोघांची दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली.


