‘स्वरमयी दिवाळी पहाट’ चे सलग तिसऱ्या वर्षी यशस्वी आयोजन
परभणी ( प्रतिनिधी)अनिकेत सराफ आणि लायन्स क्लब परभणी मेन यांनी एकत्र येऊन यावर्षी ‘स्वरमयी दिवाळी पहाट’ चे दिवाळी पाडावा शनिवार 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीच्या संगीत सभेत, सुविख्यात गायक प्रथमेश लघाटे याला आमंत्रित केले आहे. विशेष म्हणजे, लिटील चॅम्प म्हणून रसिकमनावर अधिराज्य गाजवलेले प्रथमेश हा परभणीत पहिल्यांदाच गायन करणार आहे. त्याच्या सोबत परभणीची सुपुत्री, कवि शाम यांची कन्या तर विदुषी मंजुषा पाटील कुलकर्णी यांची शिष्या रसिका पैठणकर असणार आहे
उत्सवांची नगरी असा परिचय असणाऱ्या परभणी शहरात दिवाळी निमित्त काही आयोजन व्हावे आणि स्थानिकांसह, सणा निमित्त आलेल्या बाहेरगावी स्थाईक असलेल्या परभणीकरांना सुरेल मेजवानी मिळावी,
स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावे तसेच परभणीकरांना ख्यातकीर्त पाहुण्या कलाकारांना प्रत्यक्ष ऐकता, अनुभवता यावे अशा हेतुने अनिकेत सराफ यांच्या संकल्पनेतून मागील तीन वर्षांपासून ‘स्वरमयी दिवाळी पहाट’ या कार्यक्रमाला सुरूवात झाली. सुरूवातीचे दोन वर्ष परभणी महापालिका व अनिकेत सराफ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम थाटात आयोजित झाला. परभणीकर रसिकांनी सुध्दा या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.
यावर्षी काही तांत्रिक अडचणींमुळे महापालिका या कार्यक्रमाच्या आयोजनात थेट सहभागी नाही. ही परंपरा खंडीत होऊ नये म्हणून यावर्षी अनिकेत सराफ आणि लायन्स क्लब परभणी मेन यांनी एकत्र येऊन यावर्षीचे आयोजन केले आहे. यावर्षीच्या संगीत सभेत, सुविख्यात गायक प्रथमेश लघाटे याला आमंत्रित केले आहे. विशेष म्हणजे, लिटील चॅम्प म्हणून रसिकमनावर अधिराज्य गाजवलेले प्रथमेश हा परभणीत पहिल्यांदाच गायन करणार आहे. त्याच्या सोबत परभणीची सुपुत्री, कवि शाम यांची कन्या तर विदुषी मंजुषा पाटील कुलकर्णी यांची शिष्या रसिका पैठणकर असणार आहे.
आपापले व्यवसाय, व्यावधान सांभाळत असतांना कलेची सेवा करणाऱ्या स्थानिक कलावंतांना सुध्दा या व्यासपीठावरून संधी मिळावी आणि त्यांना प्रोत्साहन मिळून त्यांची कला बहरावी या हेतुने येथील मुख्याध्यापक उपेंद्र दुधगावकर, शीतल अभ्यंकर-राठोड, उद्योजक योगेश पेडगावकर व पूजा पाटील या स्वररत्नांचा सुध्दा या मैफिलीत समावेश आहे.
या मैफिलीत, स्वर, संगीत आणि रंग असा अनोखा मिलाफ अनुभवायला मिळणार आहे. येथील राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रकार सिध्दार्थ नागठाणकर हे मैफिली दरम्यान अनुरूप पेंटींग कला सादर करणार आहेत.
प्रथमेश आणि कलावंतांना प्रा. मंगेश जवळेकर, हर्षल काटदरे, पंकज शिरभाते, विश्वेश्वर कोळंबिकर हे या मैफिलीत साथसंगत करणार असून, अनिकेत सराफ कार्यक्रमाचे निवेदन करणार आहे. सर्वांसाठी नि:शुल्क असलेल्या या मैफिलींचा जास्तीत जास्त संख्येने परभणीकरांनी आनंद घ्यावा असे आवाहन मुख्य आयोजक लायन्स क्लब परभणी मेन चे अध्यक्ष अरूण टाक तसेच ॲड. किरण दैठणकर, ओम तलरेजा, सौरभ दहिवाळ यांनी केले आहे.