गंगाखेड,(प्रतिनिधी) : येथील एका विद्यालयातील एका शिक्षकाने पत्नी व मुलीसह गुरुवारी (दि.28) दुपारी 3 वाजेच्या सुमारास एका मालगाडीसमोर झोपून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली.
अधिक माहिती अशी की रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या धारखेड शिवारात रेल्वे पुलावर शहरातील एका विद्यालयातील मसनाजी सुभाष तुडमे (वय 45) या शिक्षकाने पत्नी व मुलीसह रेल्वे मार्गावर झोपून आत्महत्या केली. त्या तीघांचे मृतदेह आढळून आल्याबरोबर प्रत्यक्षदर्शनींनी ती गोष्ट तात्काळ पोलिसांना कळविली. उपविभागीय अधिकारी दिलीप टिप्परसे, सहाय्यक पोलिस निरीक्षक आसेफ शेख, जमादार दिपक वावळे यांच्यासह अन्य कर्मचार्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली व मृतदेह ताब्यात घेवून ओळख पटविण्याचे काम सुरु केले तेव्हा खिशात सापडलेल्या मोबाईलवरुन समोरच्या व्यक्तीस संपर्क केल्यानंतर आत्महत्या केलेल्यापैकी व्यक्तीची ओळख पटली. शहरातीलच एका विद्यालयात शिक्षक असणार्या मसनाजी सुभाष तुडमे (वय 45) या शिक्षकाने पत्नी व मुलीसह आत्महत्या केल्याची माहिती समोर आली.
दरम्यान, या घटनेबाबत पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली असून, या कुटूंबियांनी आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट केले नाही. त्या संदर्भात पोलिसांनी तपास सुरु केला होता.
दरम्यान, तो शिक्षक अहमदपुर तालुक्यातील किनीकद्दु या गावचा मूळ रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे.


