परभणी,(प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशातील हिंदु समाजावर जाणिवपूर्वक होणार्या अन्याय, अत्याचारासह हल्ल्यांच्या निषेधार्थ सकल हिंदु समाजाच्या वतीने आज मंगळवारी (दि.10) सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिला व युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
शनिवार बाजारातील मैदानावरुन सकाळी 10 वाजता या मोर्चास प्रारंभ झाला नानलपेठ कॉर्नर, शिवाजी रोड, छत्रपती शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, नारायण चाळ, स्टेशन रोड मार्गे हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातील मैदानावर या मोर्च्यांचे सभेत रूपांतर झाले. या ठिकाणाहून एका शिष्टमंडळाद्वारे जिल्हा प्रशासनास सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.
मागील महिन्यांपासून बांगला देशातील भिषण परिस्थितीचा तीव्र शब्दात निषेध करण्यात येणार असून तेथील हिंदु समाजातील महिला व मुलींवरील अन्याय, अत्याचार, कुटूंबियावरील हल्ले, मालमत्तांची बेसुमार हानी तातडीने थांबवावी या दृष्टीने केंद्र सरकारद्वारे दबाव आणावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.


