परभणी,(प्रतिनिधी) : बुधवार दि 11 रोजी शहरातील बाजारपेठेत दगडफेकीसह जाळपोळीच्या घटनां घडली. आंदोलकांनी दुकानाचे तसेच वाहनाचे नुकसान केले या. झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत व संबंधित व्यापार्यांना प्रशासनाने नुकसान भरपाई त्वरित अदा करावी, जोपर्यंत नुकसान भरपाई मिळणार नाही तसेच जिल्हा पोलिस अधिक्षक व जिल्हाधिकारी या दोघा वरिष्ठ अधिकार्यांची तातडीने बदली होणार नाही तोपर्यंत बाजारपेठ बेमुदत बंद राहतील, असा इशारा जिल्हा व्यापारी महासंघाने राज्य सरकारला दिला आहे.
जिल्हा व्यापारी महासंघाची गुरुवारी (दि.12) सकाळी छत्रपती शिवाजी चौकात व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यास हजारो व्यापारी उपस्थित होते. या संतप्त व्यापार्यांनी 10 डिसेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीच्या काचेची तोडफोड झाल्याच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. संबंधित आरोपी विरुध्द कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर 11 डिसेंबर रोजी संपूर्ण शहरात त्या घटनेच्या निषेधार्थ काही संघटनांनी पुकारलेल्या बंदच्या दरम्यान प्रशासनास निवेदन सादर करण्याचे निमित्त करून 👍समाजकंटकांनी बाजारपेठांमधून केलेल्या तूफान दगडफेकीसह जाळपोळीच्या घटनांचा तीव्र निषेध व्यक्त केला.
बुधवार रोजी सकाळपासून दुपारी उशीरापर्यंत बहुतांशी ठिकाणी हे समाजकंटक खुलेआमपणे तोडफोड करत हैदोस घालत होती. त्यावेळी प्रशासनाने म्हणजेच जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व प्रभारी पोलिस अधिक्षकांनी समाजकंटकांना रोखण्याकरीता काडीचेही प्रयत्न केले नाहीत. त्याचा परिणाम समाजकंटकांनी खुलेआमपणे सर्वत्र प्रचंड अशी नासधूस केली, असा आरोपही संतप्त व्यापार्यांनी केला. दरम्यान, त्या अधिकार्यांची तातडीने बदली व्हावी, त्याचबरोबर व्यापार्यांच्या दुकानांच्या झालेल्या नुकसानीबद्दल तात्काळ पंचनामे करून त्यांना शासनाने तात्काळ मावेजा उपलब्ध करावा, अशी मागणी करण्यात आली असून जोपर्यंत मोबदला मिळणार नाही तोपर्यंत बाजारपेठ बेमुदत बंद करण्याचा निर्णय जिल्हा व्यापारी महासंघाने घेतला.
बैठकीला व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके, कार्याध्यक्ष नितीन वट्टमवार, कोषाध्यक्ष अशोक माटरा, जिल्हा केमिस्ट्र ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष संजय मंत्री, बाळकृष्ण गिराम आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी आनंद भरोसे देखील उपस्थित होते . त्यानंतर बाजारपेठ बंद करण्याचे सर्वांनी आवाहन केले. छाया,- उत्तम बोरसुरीकर)


