परभणी,(प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेसह स्व. सोमनाथ सूर्यवंशी व लोकनेते स्व. विजय वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणात आपण संसदेत आवाज उठवून त्या दोघांच्या कुटूंबियांसह आंबेडकरी चळवळीस न्याय मिळवून देवू, असा विश्वास भिम आर्मी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार चंद्रशेखर आझाद यांनी दिला.
खासदार आझाद यांनी गुरुवारी सकाळी परभणीत दाखल झाल्या पाठोपाठ स्व. सूर्यवंशी व स्व. वाकोडे यांच्या कुटूंबियांची भेट घेतली, त्यांचे सांत्वन केले. त्या पाठोपाठ जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मैदानावर आंबेडकरी चळवळीच्या वतीने सुरु असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनास भेट दिली. त्या ठिकाणी आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. परभणीतील घटना दुर्देवी आहे, या घटनेबाबत आपण तात्काळ माहिती घेतली होती. परंतु, प्रत्यक्ष दौरा केल्यानंतर त्यापेक्षाही गंभीर अशी स्थिती आढळून आली. विटंबनेच्या प्रकरणात पोलिस यंत्रणेची निष्क्रियता तसेच आंबेडकरी चळवळीतील पदाधिकार्यांसह सामान्य कार्यकर्त्यांवर केलेल्या अमानुष अत्याचाराच्या घटना, स्व. सूर्यवंशी यांचा कोठडीतील मृत्यू निषेधार्ह आहे, असे नमूद केले.
पोलिस रक्षक नाही भक्षक बनले होते. परंतु, येथील आंबेडकरी चळवळीने संघटीत होवून उभारलेला मोठा संघर्ष निश्चितच न्याय मिळवून देईल, हा संघर्ष कमजोर नाही, तसे कोणीही समजू नये, असा इशाराही खासदार आझाद यांनी दिला. जय भिम या घोषणेतच मोठी ताकद आहे, असे स्पष्ट करतेवेळी आपण या प्रकरणात दोन्ही कुटूंबियांना न्याय तर मिळवून देवून परंतु, आंबेडकरी चळवळ चिरडण्याचा केलेल्या प्रयत्नांबद्दलही संसदेत आवाज उठवू, असा विश्वास आझाद यांनी व्यक्त केला.


