परभणी,(प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणार्या सर्व आरोपींना तातडीने अटक करून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या प्रमुख मागणीसाठी शनिवारी (दि.4) परभणीमध्ये सर्वपक्षीय, सर्वजातीय, सर्वधर्मीय, सकल मराठा समाज व अन्य संघटना व प्रतिष्ठानांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड असा मूक मोर्चा काढला. यात स्व. देशमुख यांच्या मातोश्री तसेच त्यांचे बंधू, बहिण, मुलगी व मुलगा सहभागी झाले होते. या मोर्चाचा समारोप सभेतून झाला.
जिंतूर रोडवरील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर शनिवारी सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी रेलचेल सुरु झाली. विशेषतः सर्व तालुकास्थानांसह तालुक्यातून एका पाठोपाठ एक भरगच्च अशी वाहने मोठ्या संख्येने दाखल होत होती. चोहोबाजूंच्या वाहनांच्या या रांगांमुळे गंगाखेड, जिंतूर, पाथरी व वसमत रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः कोलमडली. तरुणांसह महिला व अबालवृध्दांचेसुध्दा मोठ मोठे जथ्ये या मैदानावर पोहोचले. त्यामुळे या संपूर्ण परिसर अक्षरशः गजबजला. भगवे झेंडे, गळ्यांमधून भगवे रुमाल, निषेधांचे फलक तसेच स्व. देशमुख यांच्या प्रतिमेसह हे जथ्ये, हजारो कार्यकर्ते अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने दुपारी 1 वाजेच्या सुमारास येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले.

या मोर्चात संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील, आ. सुरेश धस, आ. संदीप क्षीरसागर, खा. बजरंग सोनवणे, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, ज्योतीताई मेटे, स्थानिक खा. संजय जाधव, ज्येष्ठ नेते माजी आ. सुरेश वरपुडकर, माजी आ. सुरेशदादा देशमुख, आ. डॉ. राहुल पाटील, माजी आ.अॅड.विजय गव्हाणे, आ. राजेश विटेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे, प्रविण देशमुख, माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे, डॉ. विवेक नावंदर, डॉ. विद्या चौधरी, रविराज देशमुख, सुरेश भुमरे, काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, भारतीय जनता पार्टीचे नेते डॉ. केदार खटींग, सुभाष जावळे पाटील, गणपत भिसे, अजयराव गव्हाणे, श्रीधरराव देशमुख, अमोल देशमुख, विनोद कदम, सुनील देशमुख, सचिन देशमुख, किशोर रणेर यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.

मोर्चाच्या दरम्यानसुध्दा व्यापार्यांसह नागरीक उत्स्फूर्तपणे सहभागी होत होते. काही भागात मोर्चा दरम्यान व्यापार्यांनी आपआपले व्यवहार बंद ठेवून मूक मोर्चास उत्स्फूर्तपणे समर्थन दिले. मोर्चा महाराणा प्रताप चौक -शनी मंदिर – नानल पेठ कॉर्नर- छत्रपती शिवाजी चौक- गांधी पार्क- नारायण चाळमार्गे महात्मा फुले पुतळा परिसरात मोर्चा पोहोचला. तेथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात या मोर्चाचा समारोप झाला. या मोर्चा दरम्यान पोलिस यंत्रणेने मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी तसेच राज्य राखीव दलाच्या कंपन्याही ठिकठिकाणी तैनात केल्या होत्या. संपूर्ण मोर्चा अत्यंत शांततेत व शिस्तबध्द पध्दतीने झाला. (छाया उत्तम बोरसुरीकर- संजय घनसावंत)



