परभणी (प्रतिनिधी) प्रति वर्षी प्रमाणे कै. बकुळाबाई मुकुंदराव पेडगावकर यांच्या स्मरणार्थ कै. स्वा. सै. श्रीमती शांताबाई देशपांडे पेडगावकर यांच्यातर्फे देण्यात येणारा लोपामुद्रा पुरस्कार यावर्षी सोलापूर येथील समाजसेवक आतिश लक्ष्मण शिरसाट यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी लोपामुद्रा पुरस्कार प्राप्त झालेले अतिश सिरसाट सोलापूर येथे आपल्या संभव या संस्थेच्या माध्यमातून मनोरुग्ण झालेल्या व्यक्तींवर उपचार करून पुनर्वसन करण्यासाठी मदत करतात. लोपामुद्रा पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ मानपत्र व पाच हजार रुपये रोख असे आहे. पुरस्काराचे हे चौदावे वर्ष आहे. यावेळी झालेल्या सत्काराला उत्तर देताना सिरसाट यांनी थोडक्यात आपल्या कार्याची माहिती श्रोत्यांना दिली, सोलापूर परीसरातील व इतर ठिकाणची, कर्नाटक तसेच आंध्रप्रदेशांतील बऱ्याच ठिकाणची जवळ जवळ आठशेपेक्षा जास्त मनोरुग्णानाचे पुर्नवसनाचे कार्य आत्तापर्यंत करण्यात आले आहे, हे कार्य असेच चालु राहील या पुरस्कारा मुळे आणखी जबाबदारी वाढली आहे, असे मनोगत आतिश यांनी व्यक्त केले.

आपला विषय मांडताना सचिन पाटील यांनी भारतातील संपूर्ण हिंदू समाजाला अर्जुन विषाद योगाने ग्रासले आहे. त्यांच्यात स्वतःच्या धर्म संस्कृतीबद्दल एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण करण्यात पाश्चात्य लोक यशस्वी झाले आहेत. उदारमतवाद आणि पुरोगामीत्व यांच्या नावाखाली हिंदू लोक धर्म संस्कृतीची निंदानालस्ती करीत आहेत. हे सारे थांबवून हिंदू समाजाने स्वतःच्या धर्म संस्कृतीशी एकनिष्ठ होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन इतिहास संशोधक व अभ्यासक सचिन पाटील यांनी रविवार 5 सप्टेंबर रोजी येथे लोपामुद्रा पुरस्कार वितरण प्रसंगी दिलेल्या व्याख्यानात केले.
याप्रसंगी इतिहास अभ्यासक संशोधक व युट्यूबर श्री सचिन पाटील यांचे व्याख्यान झाले . त्यांनी हिंदू धर्मासमोरील आधुनिक आव्हाने या विषयावर आपले विचार मांडले. हा कार्यक्रम गणेश वाचनालयाच्या सभागृहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख वक्ते सचिन पाटील यांनी व्याख्यानात पुढे बोलताना म्हणाले की, देशाच्या ज्या भागातून राम विसरला तेथून राम हरवला आहे तेथे हिंदू समाजाची पीछेहाट होऊन तो अल्पसंख्या बनला असून आजच्या भारतात जर हिंदू धर्म संस्कृती टिकवायची असेल तर हिंदू समाजाने स्वतःच्या धर्माशी एकनिष्ठ झाले पाहिजे. स्वतःमध्ये असलेली सद्गुण विकृती झिडकारून देऊन दृष्टतेच्या प्रतिकारासाठी सज्ज झाले पाहिजे. केवळ राजकीय हिंदुत्व जपवू नका तर सामाजिक हिंदुत्वाचा परिपोष करून आपल्या मुलांना हिंदूधर्म संस्कृतीचे धडे द्या. असे आवाहन त्यांनी समस्त हिंदू बांधवांना केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत उमरीकर यांनी केले, सूत्रसंचालन व आभार विजय कुलकर्णी यांनी मानले.


