ज्येष्ठ पत्रकार हेमंत कौसडीकर, विजय जोशी, संतोष धारासुरकर, दिलीप माने, नितीन धूत, रमाकांत कुलकर्णी ,राजा पुजारी, जकीयोद्दीन कतीब आदी सन्मानित
परभणी(प्रतिनिधी) भारतातील लोकशाहीचा पत्रकारिता हा चौथा स्तंभ अत्यंत महत्वाचा असून अन्य तीन स्तंभावर भाष्य करण्याची आणि त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करुन देण्याची भूमिका हा स्तंभ पार पाडतो. त्यामुळे हा स्तंभ मजबूत कसा होईल? याची जबाबदारी सर्वांची आहे. भारतातील लोकशाही व्यवस्था ही जगातील सर्वोत्कृष्ट शासन व्यवस्था असून जगभरातून आपल्या लोकशाहीचा मोठा आदर केला जातो. लोकशाही व्यवस्था टिकविण्यासाठी चौथ्या स्तंभाचं योगदान मोठं असल्याचे प्रतिपादन वनामकृविचे कुलगूरु डॉ. इंद्र मणि यांनी केले.
परभणीच्या शारदा महाविद्यालयातील कै. हेमराजजी जैन सभागृहात जिल्हा पत्रकार संघ आणि शारदा महाविद्यालयाच्या वतीने दर्पण दिन आणि ज्येष्ठ पत्रकारांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. सुरुवातीस बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेचं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुजन करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार, साहित्यीक डॉ. आसाराम लोमटे हे होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी, शारदा महाविद्यालयाचे प्राचार्य बबन पवार, मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. भारत नांदुरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभू दिपके, कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. दर्पण दिनानिमित्त परभणीतील ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी, संतोष धारासूरकर, दिलीप माने, हेमंत कौसडीकर, नितीन धुत, रमाकांत कुलकर्णी, राजा पुजारी, आश्रोबा केदारे, जकीयोद्दीन खतीब आदींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी बोलताना कुलगुरू इंद्रमणी पुढे म्हणाले की, लोकशाहीतील इतर तिन्ही घटकांवर पत्रकारांच लक्ष असल्याने हे घटक व्यवस्थित काम करत आहेत .पत्रकारांनी लोकांच्या कल्याणासाठी लोकशाहीतील इतर तिन्ही स्तंभावर आपली निरिक्षक भूमिका सतत दक्ष राहून पार पाडावी असे आवाहन त्यांनी या वेळी केले .
यावेळी पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी वृत्तपत्रात हे समाजमनाचा आरसा आहेत. सर्वसामान्य जे बोलू शकत नाहीत, लिहू शकत नाहीत ते पत्रकार लिहित असतात आणि म्हणूनच त्यांना समाजाचा आरसा म्हटल्या जातं. वृत्तपत्र वाचतांना सुरुवातीला माझ्या परिसरातील बातम्या पाहतो, त्यानंतर राज्यातील बातम्या पाहत असतो. वृत्तपत्र आणि पत्रकार हे समाजाचे प्रश्न मांडून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मोठे कार्य करत असतात. पत्रकारांनी मांडलेल्या प्रश्नावर शासन आणि प्रशानाला देखील विचार करुन जनहिताचे निर्णय घ्यावे लागत असल्याचे अनेक उदाहरणं असल्याचे परदेशी म्हणाले.
यावेळी मार्गदर्शन करतांना ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी म्हणाले की, पत्रकारिता ही समाजातील रंजल्या गांजल्या आणि शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करत असते. गेल्या अनेक वर्षात पत्रकारितेत अनेक स्थित्यंतरं झाली. माध्यमांमध्ये बदल झाला असून पत्रकारांचा मुळ हेतू मात्र समाजहिताचा राहीला आहे. त्यामुळे पत्रकारांनी तटस्थपणे पत्रकारिता करावी असे आवाहन त्यांनी केले.
ज्येष्ठ पत्रकार संतोष धारासूरकर यांनी सध्याच्या युगात बदलत चाललेली पत्रकारिता यावर प्रकाश टाकतांना सोशल मिडीया आणि इलेक्ट्रानिक मिडीयाच्या माध्यमातून झालेली क्रांती आणि बदल उपस्थितांना सांगितले. हे धावपळीचं युग असून सर्वजण आपल्या मोबाईवरच सर्व काही पाहत असल्याचं त्यांनी परभणी जिल्ह्याच्या पत्रकारितेच्या गौरवशाली इतिहासाबद्दल माहिती उपस्थितांना दिली.ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यीक डॉ. आसाराम लोमटे यांनी अध्यक्षीय समारोप करत असतांना वृत्तपत्रांसमोरील आव्हान त्याच बरेाबर पत्रकारांसाठी असलेल्या अडचणींचा उहापोह करत पत्रकारांनी आपल्या ध्येयापासून दुर न जाता पत्रकारीता करावी. सध्या छापील वृत्तपत्रापेक्षा अन्य माध्यमं खुप पुढं आली आहेत. अशा माध्यमांत देखील वृत्तपत्रांनी सहभागी होत या नव्या माध्यमांना आपलंसं करुन घेणं गरजेचं आहे. वृत्त वाहिन्या, डिजीटल मिडीयाच्या माध्यमातून तात्काळ बातम्या आपल्यासमोर येत आहेत यासाठी वृत्तपत्रांनीही पुढाकार घ्यावा आणि समाजहिताचं काम करावं असं म्हणाले.
सामाजिक कार्यकर्ते डॉ. भारत नांदुरे यांनी भारतीय संविधानाच्या एक लाख प्रती वाटपाचा संकल्प केलेला असून त्यांनी या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांसह सर्व पत्रकारांना संविधानाच्या प्रतीचं वाटप केलं. तर याच कार्यक्रमात दैनिक एकजुटच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या आठ वर्षापासून पत्रकारांच्या आरोग्य शिबीराचे यशस्वीरित्या आयोजन करणारे सुर्या हॉस्पीटलचे संचालक डॉ. संजय खिल्लारे यांचा यावेळी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचं बहारदार सुत्रसंचलन राहुल वहिवाळ यांनी केलं तर उपस्थितांचे आभार डॉ. एन.व्ही. सिंगापूरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा पत्रकार संघ, महानगर पत्रकार संघ, जिल्हा डिजीटल मिडीया, डिजीटल मिडीया महानगरच्या सर्व पदाधिकार्यांनी आणि शारदा महाविद्यालयाच्या प्रााध्यापक व कर्मचार्यांनी पुढाकार घेतला.


