परभणी,(प्रतिनिधी) : तालुक्यातील दैठणा येथे धावत्या बसने अचानकपणे पेट घेतला. परंतु, चालकाने प्रसंगावधान राखून तात्काळ गाडी थांबवली व प्रवाशांना तातडीने खाली उतरवून ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
गंगाखेडहून परभणीला जाणार्या या बसमध्ये 30 प्रवासी होते. ही बस दैठणा येथे किनारा बारच्या जवळ आली असता बसला अचानकपणे आग लागली. ही बाब लक्षात येताच चालकाने स्वत: खाली उतरून सर्व प्रवाशांना बस रिकामी करण्यास सांगितले. त्यानंतर चालकाने आवाज देताच ग्रामस्थांनी दुचाकीवरून पाणी आणून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. ग्रामस्थांसह काही प्रवाशांनी देखील मदत केल्यामुळे ही आग विझली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे 30 प्रवाशांचे प्राण वाचले. ( छाया उत्तम बोरसुरीकर)


