चाटोरी येथे विवेकानंद शाळेत पालक मेळावा
पालम ( प्रतिनिधी) अलीकडील काळात मुलं परावलंबी होताना दिसत आहेत.त्यांना श्रमाचे महत्त्व पटवून सांगितले पाहिजे. त्यांच्यात शिस्त निर्माण करून संस्काराचे बाळकडू लहानपणापासूनच दिली गेले पाहिजेत. प्रत्येक आईने आपलं मूल स्वावलंबी कसं होईल यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन प्रा.डॉ. शकुंतला जवंजाळ यांनी केले.
पालम तालुक्यातील चाटोरी येथील स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीचे औचित्याने माता पालक मेळाव्याचे आयोजन दि.16 रोजी केले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कोषाध्यक्ष सुभाष ढगे, उद्घाटक म्हणून संस्थेचे अध्यक्ष प्रा. संदीप किरडे हे उपस्थित होते. यावेळी प्रा.राम कऱ्हाळे,संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य डी.बी.पवार,प्रशालेचे मुख्याध्यापक राजेश जोगदंड यांची प्रमुख उपस्थिती होती.
माता पालकांना मार्गदर्शन करताना डॉ.शकुंतला जवंजाळ म्हणाल्या, विद्यार्थ्यांना मोबाईलच्या अतिवापरापासून दूर ठेवा.त्याचा विद्यार्थ्यांवर दुष्परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक,मानसिक व बौद्धिक विकासाला धोका पोहोचत आहे.आई ही मुलांची पहिली गुरु असते.आई व मूल यांच्यात सुसंवाद असावा. मुलांचे म्हणणे ऐकून घ्यावे. लहान वयात लावलेली शिस्त व दिलेले संस्कार हे मुलांना मोठेपणी त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाला कामी येतात.मुलांच्या दैनंदिन शिस्तीकडे लक्ष देऊन त्यांना महापुरुषांच्या गोष्टी सांगाव्यात. आपल्याला जिजाऊ-सावित्रीच्या विचारांचा वारसा असला पाहिजे. त्यातूनच आपल्याला आपली मुले घडविता येतील असे मत त्यांनी व्यक्त केले.
उद्घाटन प्रसंगी प्रा. संदीप किरडे म्हणाले मुलं आईचे संस्कार व शाळेच्या शिकवणीतून घडत असतात.पालक व शिक्षक यांच्यात सुसंवाद असला पाहिजे असेही ते म्हणाले.अध्यक्षीय समारोप करताना सुभाष ढगे म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये क्षमता, कौशल्य मोठ्या प्रमाणात आहेत. त्याला योग्य आकार देण्यासाठी मातांनी लहानपणापासूनच मुलांसोबत वेळ देऊन त्यांच्या क्षमतांना,कौशल्यांना विकसित करावे. आई,शाळा हे संस्कारांचे विद्यापीठ आहेत. पालक, शिक्षक यांच्या सुसंवादातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविला पाहिजे.यासाठी मुलांच्या आईने जागृत राहिले पाहिजे.कारण अलीकडील काळात स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या स्पर्धेत आपलं मूल टिकण्यासाठी आईंनी दिवसातील काही वेळ मुलांच्या शिक्षणासाठी दिला पाहिजे. यावेळी तिळगुळ,हळदी कुंकाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमासाठी माता पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डी.बी.पवार यांनी, सूत्रसंचालन कु. वैष्णवी ढगे यांनी तर आभार नंदा शिंदे यांनी मानले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी स्वामी विवेकानंद विद्यालय व कनिष्ठ महा विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


