परभणी -(प्रतिनिधी) परभणी व शहर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि 25) ,रोजी. बाबासाहेन आंबेडकर पुतळा परिसरात घोषणाबाजी करत निदर्शने आंदोलन करून यावेळी “ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव” व “एकच मिशन मतदाराच्या हक्काचे संरक्षण” अशी जोरदार घोषणा देत जनजागृती केली. जनतेच्या मताच्या हक्कावर झालेल्या हल्ल्याविरोधात काँग्रेस पक्षाने आवाज उठवला आणि लोकशाहीचे रक्षण करण्याचा निर्धार केला. व मा. निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संस्था असून भारतीय राज्यघटनेने स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूका घेण्यासाठी या संस्थेची स्थापना केली आहे. राज्यघटनेने निवडणूक आयोगाला देशातील संपुर्ण निवडणूकांचे निर्देश आणि नियंत्रण करण्याचे अधिकार दिले आहेत. लोकशाही शासन व्यवस्थेत निवडणूक आयोगाचे अनन्यसाधारण महत्व आहे. देशातील निवडणूका मुक्त आणि निष्पक्षपणे पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. आणि निवडणुकीत मतदार हा राजा असतो परंतु मागील काही वर्षातील निवडणूक आयोगाची भूमिका पाहता ती पक्षपाती दिसत आहे.
महाराष्ट्रात नोव्हेंबर 2024 मध्ये विधानसभेच्या निवडणूका पार पडल्या आणि निवडणूकीचे निकाल पाहता ते अनाकलनीय, आश्चर्यकारक, अविश्वसनीय व काहीतरी गडबड असल्याचे दिसते. राज्यातील राजकीय परिस्थिती ही सत्ताधारी भाजपा युतीच्या विरोधात होती. सहा महिन्यापुर्वीच लोकसभा निवडणूकीत सत्ताधारी पक्षाचे पानिपत झाले होते व महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले होते. अवघ्या सहा महिन्यात हे चित्र पूर्णपणे पालटले जाऊ शकते यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. मतदार याद्यांमध्ये घोटाळा करण्यात आला, या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करुनही त्यांनी त्याकडे दूर्लक्ष केले, त्यानंतर निवडणूक निकालातही घोटाळा करण्यात आला. लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या सहा महिन्याच्या अंतरात तब्बल 50 लाख मतांची वाढ कशी झाली? मतदानादिवशी सध्याकाळी 5 वाजता जाहिर केलेली मतदानाची टक्केवारी व निवडणूक आयोगाने दुस-या दिवशी सकाळी जाहिर केलेली टक्केवारी यामध्ये मोठी तफावत आहे. यातही 76 लाख मतदान वाढलेले दाखवले
आहे. सर्व मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमे-याची व्यवस्था होती. त्यामुळे मतदार याद्यातील घोळ, रात्रीच्या अंधारात वाढलेले 76 लाख मतदान यांचे पुरावे निवडणूक आयोगाने द्यावेत अशी मागणी कॉग्रेस पक्षाने केली असता आजपर्यंत ही माहिती देण्यात आलेली नाही.
राज्यातील मतदारांचाही विधानसभेच्या निकालावर विश्वास बसलेला नाही. आपले मतदान चोरले गेल्याची भावना जनतेत आहे. जनतेची ही भावना महत्वाची आहे. आज दिनांक 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जात आहे. या दिवसाचे औचित्य साधून कॉग्रेस पक्ष निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभाराचा पर्दापाश करत आहे. निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा न करता निष्पक्ष व पारदर्शक निवडणूका घेण्याचे आपले कर्तव्य पार पाडावे तसेच लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांचा आदर, सन्मान तसेच विश्वास कायम ठेवून विश्वासार्हता अबाधित राहिल याकडे निवडणूक आयोगाने लक्ष द्यावे. असे सांगण्यात आले,
सदरील निषेध आंदोलनातं माजी मंत्री, जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर,माजी खा. तुकाराम रेंगे पाटील, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, रामभाऊ घाडगे, शहराध्यक्ष नदीम इनामदार, बाळासाहेब देशमुख, इरफान उर रहेमान, विशाल बुधवंत, अतिक उर रहेमान,सुहास पंडित, शेख खाजा, मोईन माऊली, बाळासाहेब फुलारी, खदिर लाला हाश्मी, दिगंबर खरवडे, शेख मतीन, सत्तार पटेल,वैजनाथ देवकते, सचिन जवंजाळ, अब्दुल सइद,नागनाथ काकडे यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या असून बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


