नूतनमध्ये घर घर संविधान उपक्रम संपन्न
सेलू (प्रतिनिधी) भारतीय लोकशाही ही केवळ राजकीय लोकशाही नाही. तर ती सामाजिक व आर्थिक लोकशाही आहे. संविधानाने आदर्श लोकशाही निर्माण करून सर्वस्तरातील नागरिकांना विकासाची संधी उपलब्ध करुन दिली. असे प्रतिपादन डॉ. सुरेश हिवाळे यांनी केले. ते नूतन विद्यालयात आयोजित शिक्षण विभागाच्या घर घर संविधान या उपक्रमात शनिवार ( दि. २५ ) रोजी राष्ट्रीय मतदार दिनी बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक किरण देशपांडे हे होते. व्यासपीठावर गणेश माळवे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. सुरेश हिवाळे म्हणाले की, ‘ भारतीय संविधानाने समानतेचा हक्क दिला. लोकशाही बळकट केली. संविधान हे सुसंस्कृत नागरिक घडवण्याची आचारसंहिता आहे. मतदान हा लोकशाहीचा प्राण आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी मतदान केले पाहिजे. ‘ असेही ते म्हणाले. कार्यक्रमात संध्या फुलपगार यांनी ‘ भीमा तुझ्यामुळे ‘ ही कविता सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर जोशी यांनी केले. सुत्रसंचलन डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी केले. तर आभार प्रदर्शन सुनिता सांगुळे यांनी केले.


