परभणी (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक व पालक यांनी नेहमी जागरूक राहिले पाहिजे. विद्यार्थी यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये परिश्रम व मेहनत करण्याची क्षमता विकसित करावी. बदलत्या परिस्थितीत स्वतःला सिद्ध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास स्वतःच्या अंगी वृद्धिंगत करावा. व यश प्राप्त करावे. असे प्रतिपादन स्व. प्रा.वासंतीताई नावंदर यांच्या जयंती निमित्त आयोजित *विद्यार्थी शिक्षक पालक* संवाद मेळाव्यात प्रा. विष्णू घुगे यांनी केले.

शहरातील बाल विद्यामंदिर शिक्षण संस्था संचलित बाल विद्या फाउंडेशनच्या वतीने संस्थेच्या माजी उपाध्यक्ष स्व. प्रा. वासंतीताई नावंदर यांच्या प्रथम जयंती निमित्त *विद्यार्थी शिक्षक पालक* संवाद मेळावा आयोजित केला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.विलास पोहंडूळकर हे होते तर यावेळी संस्था सचिव डॉ. विवेक नावंदर ,संस्था सदस्य, ॲड अशोक सोनी, एम. जी. विहिटकर, सदस्या डॉ. अनिता विवेक नावंदर, प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण बोराडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध समुपदेशक प्रा. विष्णू घुगे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना समुपदेशक प्रा. विष्णू घुगे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी संकल्पना समजून घेऊन अध्ययन करावे व पालकांनीही विद्यार्थ्यांची आवड,क्षमता,व कौशल्य लक्षात घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे. व विद्यार्थ्यांच्या करियर च्या दृष्टिकोनातून पालकांनी शालेय जीवनापासून सजग राहणे अत्यावश्यक असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध अभ्यास आणि वेळेचे नियोजन केल्यास व यश हमखास मिळते. तसेच यश अपयशाला समतोलपणे स्वीकारण्याची मानसिकता विकसित करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था सचिव डॉ. विवेक नावंदर यांनी केले. यामधून त्यांनी *विद्यार्थी शिक्षक पालक संवाद मेळावा आयोजना मागील हेतू विषद केला विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बाल विद्यामंदिर शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या भविष्याचा वेध घेऊन नेहमीच अग्रेसर असते. विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आयोजन करीत असते असे सांगून नवीन शैक्षणिक धोरण NEP 2020 अंतर्गत होणारे बदल या बाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांनी जिज्ञासा वृत्ती जागृत ठेवून स्वतःमध्ये परिवर्तन करावे म्हणजे स्पर्धेच्या युगात यश निश्चित मिळते.असे सांगितले.
आपल्या अध्यक्ष समारोपीय भाषणामध्ये ॲड. विलास पोहंडूळकर यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.व आवडीला करियर बनवले तर यश निश्चित प्राप्त होते असे प्रतिपादन केले.
या मेळाव्यास विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष ढगे यांनी केले. तर आभार नरेंद्र वानरे यांनी मानले.


