पावसाळ्यातील अडथळे पार करून 5 हजार 400 फूट उंचीवर फडकावला तिरंगा
परभणी,(प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे ‘एव्हरेस्ट’ म्हणून ओळखल्या जाणार्या राज्यातील सर्वोच्च कळसुबाई शिखरावर परभणी जिल्ह्यातील पाच महिलांनी ऐतिहासिक यश मिळवले आहे. शनिवार 16 ऑगस्ट रोजी सकाळच्या सत्रात सुरू झालेल्या मोहिमेत अवघ्या साडेतीन तासांच्या कठीण प्रयत्नानंतर 5 हजार 400 फूट उंचीवर असलेले हे शिखर त्यांनी सर केले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात बारी गावाच्या हद्दीत वसलेले कळसुबाई शिखर हे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न मानले जाते. पाथरीसह जिल्ह्यातील ज्योत्सना पौळ, रुक्मिणी जाधव, किरण धर्मे, रंजना जाधव आणि रोहिणी दिगे या पाच महिला गिर्यारोहकांनी या मोहिमेत सहभाग घेतला. पावसाळ्यात ओलसर वाटा, निसरडे दगड, चिखल आणि सतत बदलणारे हवामान यामुळे प्रवास अधिकच कठीण झाला होता. तरीही परस्परांना दिलेले मानसिक बळ आणि उत्साहामुळे त्यांनी हे आव्हानात्मक शिखर सर केले. शिखरावर पोहोचताच सर्वांनी तिरंगा फडकावला आणि मभारत माता की जयफच्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. त्या क्षणी प्रत्येकाच्या डोळ्यांत अभिमान आणि समाधान झळकत होते.
मोहिमेचा अनुभव सांगताना सहभागी महिलांनी सांगितले की, चढाईदरम्यान थकवा, पावसाचा मारा आणि निसरडी वाट या मोठ्या अडचणी होत्या. मात्र, एकमेकांच्या पाठबळामुळे हे यश शक्य झाले. कळसुबाई शिखर सर करणे हे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते आणि जिल्ह्यातील या पाच जणींनी ते पूर्णत्वास नेले असल्याने परिसरात त्यांच्या यशाचे कौतुक होत आहे.


