परभणी (प्रतिनिधी) परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ दुष्काळ जाहीर करुन अतिवृष्टीग्रस्त शेतकºयांना तात्काळ सरसकट आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आ डॉ. राहुल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंगळवार, दि.१६ सप्टेंबर रोजी मुंबईत भेट घेऊन केली. दरम्यान, आ. पाटील यांनी काल चिखलातून वाट काढत झरी, साडेगाव, मिर्झापूर, पिंपळा, जलालपूर, मांडवा, वाडी दमई आदी शिवारातील नुकसानीची पाहणी केली होती. त्यानंतर मंगळवारी थेट मुंबईत जाऊन उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेत त्यांना नुकसानीची तिव्रता सांगितली.
यावेळी आ.डॉ.राहुल पाटील यांच्यासोबत आ.राजेश विटेकर आ.रत्नाकर गुट्टे उपस्थित होते.
परभणी मतदार संघासह जिल्ह्यात आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सतत होणाऱ्या ढगफुटी सदृश पावसामुळे मूग, उडीद, कापूस, सोयाबीन व खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली असून नदी,ओढे, नाल्या काठच्या जमिनी पुरामुळे खरडून गेल्या आहेत. जुलै महिन्यात ६० हजार ७२९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान होऊन ८७ हजार ९९ शेतकरी बाधित झाले असल्याचे प्रशासनाच्या अहवालात नमूद आहे. आॅगस्ट महिन्यात २२ हजार ८९१ हेक्टर क्षेत्र प्रभावित होऊन २९ हजार ६०३ शेतकरी नुकसानग्रस्त झाले असल्याचे प्राथमिक आकडेवारीत दिसते. परंतू प्रशासनाकडून फक्त आकडेवारीच ऐकायला मिळत असून प्रत्यक्षात शासनाकडून शेतकºयांना आर्थिक मदत मिळाली नसल्याचे आ.पाटील यांनी निदर्शनास आणून जिल्हा प्रशासनाच्या दिरंगाईबाबत उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे संताप व्यक्त केला. दि.१० ते १५ सप्टेंबर पर्यंत तीन वेळा अतिवृष्टी झाली आहे. २४ महसूल मंडळांत एकाच दिवशी मुसळधार पावसाची नोंद झाली. अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. तरीसुद्धा जिल्हा प्रशासन धिम्म गतीने पंचनामे करून मदतीचा अंतिम अहवाल शासनाकडे पाठविण्याबाबत तात्काळ पावले उचलत नसल्याची तक्रार देखील उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली. शासनाने पंचनामे करण्यात वेळ न घालवता ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट मदत देण्याची मागणी आ. पाटील यांनी यावेळी केली.
*चिखलात उतरुन केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी*
मुंबईला जाण्यापुर्वी सोमवारी आ. पाटील यांनी साडेगाव, पिंगळी कोथाला, टाकळी बोबडे आदी शिवारात नुकसानीची पाहणी केली. ट्रॅक्टरवर बसून पुरग्रस्त भागात जाऊन चिखलात उतरुन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. घाबरु नका, काळजी करुन नका, सर्व मदत मिळवुन देतो असे सांगत शेतकºयांना आधार दिला. झरी महसूल मंडळामध्ये मागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे नदी, नाले, ओढ्यांना पुर आल्याने अनेकांच्या शेतात गुडघाभर पाणी साचले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून जवळपास १२०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून नुकसानीचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. झरी महसूल मंडळात १ जून पासून १४ सप्टेंबर पर्यंत ७६४.२० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीने शेतीसह पशुधन, घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने कापूस, सोयाबीन, तुर, हळद आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मंडळातील साडेगाव, मिर्झापूर, पिंपळा, जलालपुर, मांडवा, वाडी दमई या शिवारातील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
अतिवृष्टीने नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करताना आ. डॉ. राहुल पाटील यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी उदयसिंग भोसले, तहसीलदार संदीप राजापुरे, तालुका कृषी अधिकारी नांदे, मंडळ कृषी अधिकारी योगेश नीलवर्ण, उप कृषी अधिकारी हरिभाऊ जाधव, कृषी सहाय्यक झरी एस. एन. भोसले, ग्राम महसूल अधिकारी देशमाने, माजी जि.प. सदस्य दिनेश बोबडे, संदीप झाडे, सुनील पंढरकर, बंडू नाना बिडकर, रामकिशन मुळे, गंगाधर गाडगे, रामा कदम, प्रल्हाद देवडे, दिपकराव देशमुख, सुदामराव सोनवणे, बम्हानंद सावंत, किरण देशमुख, शक्ती सावंत, सुरेश देशमुख, विशाल देशमुख, संतोष देशमुख, किशोर देशमुख, योगेश शिरडकर, तुषार काळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नाला, ओढ्याचे पाणी घरात शिरून नुकसान झालेल्या नागरीकांना तात्काळ मदत करण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना आ.डॉ. पाटील यांनी दिल्या.


