परभणी,(प्रतिनिधी) यशस्वीनी महिला मंच सातत्याने सामजिक,सांस्कृतीक,आरोग्यदायी उपक्रम राबवत महिलांसाठी हक्काचे व्यासपिठ निर्माण केले आहे.या माध्यमातून तीन हजार महिला एकत्र आल्या आहेत.त्यामुळे भविष्यात हा मंच महिलांच्या कुटूंबाचा अविभाज्य घटक असेल असे प्रतिपादन आ.डॉ.राहुल पाटील यांनी केले.

यशस्वीनी महिला मंचच्या वतीने शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात मंगळवार (दि.23)रोजी रास दांडीया गरबा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उदघाटन कार्यक्रमात आ.डॉ.पाटील बोलत होते.यावेळी मंचच्या अध्यक्षा डॉ.संप्रिया पाटील,सहसंपर्क प्रमुख डॉ.विवेक नावंदर, महिला जिल्हा संघटक अंबिका डहाळे, सोनिया जामकर,अनिता नावंदर, आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ.पाटील म्हणाले,यशस्वीनी महिला मंच जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आदर्श मंच म्हणून पुढे आला आहे.निराधार,वंचित,बेरोजगार महिलांना स्वावलंबी करुन त्यांना प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.5 हजार महिलांना शिलाई मशिन देऊन महिलांना आर्थिक हातभार लावला आहे.सातत्याने आरोग्य शिबीर,सांस्कृतीक कार्यक्रम,महिला बचत गटांचे विक्री,प्रदर्शन घेऊन विविध क्षेत्रात नावलौकीक मिळवला आहे.आर.पी. हॉस्पीटलमध्ये मॅमोग्राफी मशिन उपलब्ध झाली असून महिलांमध्ये कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढले असून या मशीनमुळे कॅन्सरचे निदान तात्काळ होऊन उपचार लवकर घेता येतात.या तपासणीसाठी महिलांना 20 टक्के सुट देण्यात आली आहे.यासाठी देखील यशस्वीनी महिला मंच पुढाकार घेत आहे.असे सांगत मंचसोबत सध्या तीन हजार महिलांची नोंदणी झाली आहे.यापुढे सातत्याने आरोग्य शिबीर घेणार असल्याचे आ.पाटील यांनी सांगीतले.
यावेळी बोलताना डॉ.संप्रिया पाटील म्हणाल्या,शहरासह तालुक्यातील विविध क्षेत्रातील महिला या मंचच्या माध्यमातून एकत्र आल्या आहेत.त्या व्यक्त होत आहेत.आपली कला,संस्कृती,पंरपंरा जपण्यासाठी पुढे येत आहेत.रोजगार, आरोग्य आणि सामजिक उपक्रम या त्रीसुत्रीवर आधारीत मंचची वाटचाल सुरु आहे असे त्यांनी सांगीतले.
यावेळी सिनेअभिनेत्री माधुरी लोकरे यांनी उपस्थिती लावत कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यक्रमासाठी शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशस्वीनी महिला मंचच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.


