*‘वंदे मातरम’ गीताच्या सामुहिक गायनास उत्स्फुर्त प्रतिसाद*
परभणी,(प्रतिनिधी) – “वंदे मातरम” हे गीत भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रेरणास्थान आहे. त्यातील देशप्रेम, शौर्य आणि एकतेचा आत्मा आपल्या कृतीतून जिवंत ठेवणे हीच खरी देशसेवा आहे. या गीताच्या प्रेरणेतून प्रत्येकाने देशाप्रेमाची भावना जोपासावी. विशेषत: विद्यार्थ्यांनी या गीतातून प्रेरणा घेऊन देशप्रेम आणि प्रगतीचा आधार बनावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.
‘वंदे मातरम’ या गीतास 7 नोव्हेंबर 2025 रोजी 150 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने आज जिल्हा क्रिडा संकुल येथे ‘वंदे मातरम’ गीताचे सामूहिक गायन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. या कार्यक्रमादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रेक्षपण करण्यात आले होते.
कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अरुणा ढालकरी, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार, अनिता भालेराव, तहसिलदार डॉ. संदीप राजापुरे आदींसह विभागप्रमुख, नागरिक व मोठया संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले की, इ.स. 1875 मध्ये बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांनी त्यांच्या आनंद मठ कादंबरी मध्ये ‘वंदे मातरम’ हे गीत लिहिले आहे. ते प्रथम 1896 मध्ये कलकत्ता अधिवेशनात सर्वप्रथम सरलादेवी चौधराणी यांनी गायले होते. 1875 मध्ये लिहिलेल्या या गीतास आज 7 नोव्हेंबर रोजी 150 वर्ष पूर्ण झाले आहे. हे गीत स्वातंत्र्य चळवळीमध्ये शौर्याचे प्रतीक बनलेले होते. या गीताने समाजामध्ये देशप्रेम जागृती निर्माण केली. या गीतापासून प्रेरणा घेऊन अनेक क्रांतीकारक घडले. स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचा सहभाग व बलीदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. या गीतातून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने देशभक्तीची ज्योत प्रज्वलित ठेवावी.
प्रारंभी दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यानंतर वंदे मातरम गीताचे सामुहिक गायन करण्यात आले. एनव्हीएस मराठवाडा हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी तब्बला व पेटीच्या साथीने मधुर आवाजात सामुहिक गायनात सहभाग घेतला होता. याच शाळेच्या विद्यार्थ्यांनी नाटिकेच्या माध्यमातून वंदे मातरम गीताचा इतिहास अतिशय सुंदर पध्दतीने सादर केला. शाळेचे मुख्याध्यापक आनंद पांडे यांनी आपल्या मनोगतातून भारताचा स्वातंत्र लढा व वंदे मातरम गीताचे महत्त्व यावेळी विषद केले. प्रास्ताविक तहसिलदार डॉ. राजापुरे यांनी केले. या कार्यक्रमास नागरिक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमांस मोठया संख्येने विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थींनी, अधिकारी, कर्मचारी, तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.
000000


