परभणी,(प्रतिनिधी) : दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर बुधवार 24 जून रोजी परभणी जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले. सकाळपासून जिल्ह्यात विविध भागांत पावसाने हजेरी लावल्याने उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला असून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्यांमध्येही समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सकाळी सुमारे दहाच्या सुमारास परभणी शहरासह सेलू आणि जिल्ह्यातील इतर अनेक भागांत पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला, तर काही भागांत जोरदार सरी बरसल्या. सायंकाळपर्यंतही रिमझिम पावसाची हजेरी कायम होती. मान्सूनची वाटचाल वेगाने सुरू असून प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी बुधवारी परभणी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. तसेच पुढील शनिवार (दि. 27 जून) पर्यंत येलो अलर्ट देण्यात आला असून काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शेतकरी, नागरिक आणि पशुपालकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विजांच्या कडकडाटादरम्यान झाडाखाली किंवा उघड्या जागेत थांबणे टाळावे, तसेच हवामानातील बदल लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने म्हटले आहे.
दरम्यान, पावसामुळे खरीप हंगामाच्या पेरण्यांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून जिल्ह्यातील शेतकरी वर्गाने या पावसाचे स्वागत केले आहे. उष्णतेच्या तीव्र लाटेनंतर झालेल्या या पावसामुळे वातावरणातही गारवा निर्माण झाला आहे.


