परभणी,प्रतिनिधी) : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात आयोजित खासदारांच्या बैठकीत परभणी लोकसभा मतदारसंघातील रेल्वे विकास, प्रवाशांच्या सुविधा आणि विविध प्रलंबित प्रश्नांबाबत शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी सविस्तर चर्चा करत रेल्वे प्रशासनासमोर अनेक महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या. मराठवाड्यातील रेल्वे पायाभूत सुविधांचा विकास, प्रवाशांच्या सुरक्षिततेत वाढ आणि रेल्वे सेवांचे आधुनिकीकरण यावर त्यांनी विशेष भर दिला.
बैठकीत नांदेड रेल्वे मंडळाचा विस्तार मराठवाड्यातील अधिक भागांपर्यंत करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. परभणी, पूर्णा आणि परळी वैजनाथ येथील प्रस्तावित रेल्वे बायपासची कामे तातडीने पूर्ण करण्याबरोबरच परभणी रेल्वे स्थानकाच्या पुनर्बांधणीच्या कामाला गती देण्याची मागणीही करण्यात आली. परभणी स्थानकावर कोच वॉटर फिलिंगची कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून देणे, प्लॅटफॉर्म क्रमांक 4 व 5 चे काम लवकर पूर्ण करणे तसेच परभणी-पिंगळी, गंगाखेड आणि पेडगाव येथील रेल्वे उड्डाणपूल व रेल्वे गेटसंदर्भातील प्रलंबित कामे मार्गी लावण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
पूर्णा जंक्शनवरील पीआयटी लाईनची क्षमता वाढविणे, प्रमुख स्थानकांवर आधुनिक उद्घोषणा प्रणाली, डिजिटल टाइमटेबल डिस्प्ले बोर्ड आणि इलेक्ट्रिक लोको शेड उभारणे यासह ङ्गअफ श्रेणीच्या परभणी रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक प्रतीक्षालयासह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही खासदार जाधव यांनी केली. प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) आणि शासकीय रेल्वे पोलिस (जीआरपी) जवानांची संख्या वाढवावी, स्थानकांवरील सीसीटीव्ही व्यवस्था अधिक सक्षम करावी, तिकीट तपासणी यंत्रणा बळकट करावी तसेच प्रमुख स्थानकांवर जीआरपी चौक्या कार्यक्षम कराव्यात, असे त्यांनी सांगितले. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या ठिकाणी संरक्षणात्मक उपाययोजना करण्याबरोबरच प्रमुख स्थानकांवर पाच रुपयांत शुद्ध आरओ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली.
पूर्णा-पांगरा मार्गावरील दीर्घकालीन प्रश्न तातडीने सोडवून नागरिकांसाठी पर्यायी रस्ता विकसित करण्याची आवश्यकता त्यांनी बैठकीत मांडली. तसेच नांदेड-पनवेल, अमरावती-पुणे, नागपूर-कोल्हापूर, केएसआर बेंगळुरू-नांदेड, रायलसीमा, नांदेड-श्रीगंगानगर, सांगली-परळी डीईएमयू आणि पूर्णा-पटना एक्स्प्रेससह विविध रेल्वेगाड्यांच्या सेवा विस्तार आणि सुधारणा करण्याची मागणी केली.
मराठवाड्याला देशातील विविध भागांशी अधिक प्रभावी रेल्वे जोडणी मिळावी यासाठी नांदेड-जोधपूर/जैसलमेर एक्स्प्रेस, नांदेड-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस, छत्रपती संभाजीनगर-हैदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस, सिकंदराबाद किंवा नांदेड-अयोध्या/वाराणसी अमृत भारत एक्स्प्रेस, छत्रपती संभाजीनगर-यशवंतपूर एक्स्प्रेस, छत्रपती संभाजीनगर-नागपूर एक्स्प्रेस तसेच नांदेड-हरिद्वर एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली.
याशिवाय गंगाखेड आणि मानवत रोडसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर अधिक रेल्वेगाड्यांना थांबा देण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. अमरावती-पुणे एक्स्प्रेस आणि कोल्हापूर-धनबाद एक्स्प्रेसला गंगाखेड येथे थांबा देण्यात यावा, तर नंदीग्राम एक्स्प्रेस, नांदेड-हुजूर साहिब एक्स्प्रेस, नागरसोल-नरसापूर एक्स्प्रेस, अजंता एक्स्प्रेस आणि जनशताब्दी एक्स्प्रेसला मानवत रोड येथे थांबा मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली.
परभणी लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण मराठवाड्याच्या रेल्वे विकासासाठी, प्रवाशांच्या सोयी-सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले रेल्वे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपला पाठपुरावा यापुढेही सातत्याने सुरू राहील, अशी ग्वाही खासदार संजय जाधव यांनी दिली.


