परभणी,(प्रतिनिधी) : स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाच्या माध्यमातून महानगरपालिकेने प्रभाग क्रमांक 4 मधील ममता कॉलनीतील पाण्याच्या टाकीजवळ निर्माण झालेली मोठी कचराकुंडी बंद केली. सोमवारी (दि. 12) हा उपक्रम राबवून संबंधित जागेवर रांगोळी काढत परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले.

महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या संकल्पनेतून, उपायुक्त तुकाराम कदम आणि विभागप्रमुख मिर्झा तन्वीर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. स्वच्छता निरीक्षक प्रल्हाद देशमाने आणि सफाई कर्मचार्यांनी ही कचराकुंडी बंद करून परिसर स्वच्छ केला. शहरातील स्वच्छता राखणे ही महानगरपालिकेसोबतच प्रत्येक नागरिकाचीही नैतिक जबाबदारी आहे. नागरिकांनी घरातील कचरा उघड्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी न टाकता महानगरपालिकेच्या घंटागाडीतच द्यावा. नागरिकांनी स्वच्छतेच्या नियमांचे पालन करून सहकार्य केल्यास परभणी शहर स्वच्छ आणि सुंदर होण्यास मदत होईल, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले.
या उपक्रमावेळी शहर समन्वयक तुराब खान, मुख्य स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुरा, स्वच्छता निरीक्षक प्रल्हाद देशमाने, मोहम्मद अब्दुल शादाब, शशी लहाने, मुकादम जय मकरंद, पुरभाजी उबाळे, शांताबाई गायकवाड, मीना भराडे, दिलीप चौरंगे, सुरेश लहाने यांच्यासह सफाई कर्मचारी उपस्थित होते.


